अलिबाग; पुढारी वृत्तसेवा : खोपोली पोलीस ठाणे कार्यक्षेत्रातील साजगाव आणि देवन्हावे या दोन ग्रामपंचायतींसाठी मतदान सुरू असताना बेकायदेशीर शस्त्रे आणि गुटख्याची वाहतूक करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. प्रवासी वाहनातून गुटखा आणि शस्त्रांची वाहतूक करताना ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी चालक जलील खान (वय ३०, रा. हाळ) यास अटक करून ६ लाख २६ हजार रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
साजगाव व सारसन या भागामध्ये एक प्रवासी वाहन संशयीतरित्या फिरत असल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थांकडून सकाळी आठ वाजता प्राप्त झाली होती. या वाहनाद्वारे मतदान प्रक्रियेच्या कामकाजावर प्रभाव पाडण्याचे प्रयत्न सुरू आहे. हे लक्षात घेऊन खोपोलीचे पोलीस निरिक्षक शिरीष पवार यांनी या वाहनाची शोध मोहीम सुरू केली. खोपोली पोलिसांना हे वाहन ही ताकई-आडोशी रस्त्याला दिसून आल्याने त्यांनी वाहनाचा पाठलाग सुरू केला. वाहन चालकास त्याचा पाठलाग होत असल्याचे समजल्यानंतर त्याने आपले वाहन वेगाने खोपोलीच्या दिशेने नेण्यास सुरूवात केली.
परंतू, खोपोली पोलिसांच्या पथकाने वाहनचा थरारक पाठलाग करून ताकई गावच्या हददीमध्ये पेण – खोपोली रस्त्यालगत वाहन चालकासह पकडले. चालकास ताब्यात घेऊन वाहनाची जागीच झडती घेतली असता त्यामध्ये ७३ हजार १२८ रूपये किंमतीचा गुटखा व तंबाखूसह एक नकली बंदूक आणि तीन तलवारी अशी अवैध घातक शस्त्रे असल्याचे तपासणीत निष्पन्न झाले. ही कारावाई खोपोली पोलीस निरिक्षक शिरीष पवार, सपोनि राकेश कदम, पोहवा सागर शेवते, पोना सतिश बांगर, पोकॉ कादर तांबोळी या पथकाने केली आहे.
हेही वाचा;