Raigad Hirkani Wadi villagers Protest Warning
महाड: किल्ले रायगडच्या पायथ्याशी वसलेल्या हिरकणी वाडीतील ग्रामस्थांच्या बांधकामांबाबत शासकीय यंत्रणांकडून घेतल्या जाणाऱ्या हरकतींचा ग्रामस्थांनी तीव्र निषेध केला आहे. "आम्ही शिवकाळापासून येथे वास्तव्यास आहोत, आमच्या हक्काच्या घरांवर अन्याय झाल्यास तो सहन केला जाणार नाही," असा इशारा सामाजिक कार्यकर्ते आणि हॉटेल व्यावसायिक गणेश अवकीरकर यांनी दिला आहे.
गेल्या काही वर्षांत रायगडावर येणाऱ्या शिवभक्त पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. या पर्यटकांच्या निवासासाठी आणि जेवणासाठी स्थानिक ग्रामस्थांनी आपल्या घरांच्या अवतीभवती बांधकामे करून रोजगाराची साधने निर्माण केली आहेत. यामुळे परिसरातील बेरोजगारी दूर होऊन स्थानिकांना आर्थिक स्थैर्य मिळाले आहे. मात्र, आता याच बांधकामांना लक्ष्य केले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
किल्ले रायगडाला 'युनेस्को'च्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत मानांकन मिळाल्यानंतर काही अटी व शर्ती लागू करण्यात आल्या आहेत. त्यानुसार परिसरातील बांधकामे असावीत, असे निर्देश दिले जात आहेत. मात्र, या नियमांबाबत शासनाने स्थानिक ग्रामस्थांना कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही, असे गणेश अवकीरकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी निदर्शनास आणले.
काही शासकीय अधिकाऱ्यांमार्फत युनेस्कोच्या नावाखाली येथील बांधकामांवर कारवाई केली जाणार असल्याचे वृत्त पसरत आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. "आमची घरे ही पूर्वापार असून ती अनधिकृत म्हणणे दुर्दैवी आहे. अशा चुकीच्या वृत्तांचा आणि प्रवृत्तीचा आम्ही निषेध करतो," असे ग्रामस्थांनी म्हटले आहे.
"छत्रपती शिवरायांच्या काळापासून राहणाऱ्या हिरकणी वाडीतील ग्रामस्थांच्या विरोधात अन्याय झाल्यास आम्ही स्वस्थ बसणार नाही," असा इशारा गणेश अवकीरकर, लहू अवकीरकर, रामचंद्र अवकीरकर व इतर ग्रामस्थांनी दिला आहे.