नागोठणे येथील अंबा नदीने धोका पातळी ओलांडली आहे Pudhari
रायगड

Raigad Rain | अंबा नदीने ओलांडली धोका पातळी; कुंडलिका इशारा पातळीवर

रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

Amba River Danger Level

रायगड : रायगड जिल्ह्यात गेल्या २४ तासांत झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. नागोठणे येथील अंबा नदीने धोका पातळी ओलांडली आहे. तर डोलवहाल येथील कुंडलिका नदीने इशारा पातळी पार केली असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. वाढत्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्याचे आवाहन केले आहे.

जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी १२१.४ मिमी पावसाची नोंद झाली असून अनेक भागांत पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. रोहा तालुक्यातील नागोठणे बंधाऱ्यावरील अंबा नदीने धोका पातळी ओलांडल्याने प्रशासनाने नदीकाठच्या गावांना विशेष सतर्कतेचा इशारा दिला आहे. तसेच पाली-सुधागड परिसरातही जलपातळीत मोठी वाढ झाली असून परिस्थितीवर प्रशासनाकडून सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे.

रोहा तालुक्यातील डोलवहाल बंधाऱ्यावरील कुंडलिका नदीनेही २३ मीटरची इशारा पातळी ओलांडली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहून आवश्यक असल्यास तातडीने सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

पोलादपूर आणि तळा तालुक्यात सर्वाधिक पाऊस

गेल्या २४ तासांत पोलादपूर तालुक्यात सर्वाधिक १८०.७ मिमी पावसाची नोंद झाली. त्यापाठोपाठ तळा तालुक्यात १६६.० मिमी पाऊस झाला. सुधागडमध्ये १४८.९ मिमी, महाडमध्ये १३९.६ मिमी, रोहामध्ये १३८.३ मिमी, उरणमध्ये १३५.३ मिमी, पेणमध्ये १२८.७ मिमी, श्रीवर्धनमध्ये १२६.३ मिमी आणि अलिबागमध्ये १२४.५ मिमी पावसाची नोंद झाली.

याशिवाय म्हसळा तालुक्यात ११२.८ मिमी, माणगावमध्ये १०७.९ मिमी, पनवेलमध्ये १०३.९ मिमी आणि मुरुडमध्ये १०३.७ मिमी पाऊस झाला. खालापूर तालुक्यात ९०.३ मिमी पाऊस झाला असून कर्जत तालुक्यात सर्वात कमी ६४.१ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

इतर नद्यांची स्थिती नियंत्रणात

जिल्ह्यातील इतर नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत असली तरी त्या अद्याप इशारा पातळीखाली आहेत. महाड येथील सावित्री नदी ३.६५ मीटर, खालापूरमधील पाताळगंगा नदी १८.३० मीटर, कर्जतमधील उल्हास नदी ४३.१५ मीटर आणि पनवेलमधील गाढी नदी ३.१५ मीटर पातळीवर वाहत आहे.

प्रशासन हायअलर्टवर

जिल्ह्यातील १५ तालुक्यांपैकी १३ तालुक्यांमध्ये गेल्या २४ तासांत १०० मिमीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. नद्यांच्या वाढत्या पाणीपातळीमुळे संपूर्ण प्रशासन सतर्क असून आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा हायअलर्टवर ठेवण्यात आली आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे आणि आवश्यक असल्यास तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे, असे आवाहन रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT