Raigad Heatwave Pudhari
रायगड

Raigad Heatwave: सूर्यदेव कोपला, रायगड तापला; उष्णतेच्या लाटेने जनजीवन होरपळले

तापमानाचा पारा दिवसेंदिवस चढत असून, उष्णतेच्या झळांनी जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.

पुढारी वृत्तसेवा

सुवर्णा दिवेकर

अलिबाग: एप्रिलच्या अखेरीस उन्हाळ्याने अक्षरशः हैराण केले असून रायगड जिल्हा तापाच्या विळख्यात सापडला आहे. “सूर्यदेव कोपला” ही उपमा आता केवळ म्हण राहिलेली नसून प्रत्यक्षात नागरिकांच्या अंगावर येणारा अनुभव ठरत आहे. तापमानाचा पारा दिवसेंदिवस चढत असून, उष्णतेच्या झळांनी जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.

जिल्ह्यातील अलिबाग, पेण, पनवेल, महाड, माणगाव या भागांत तापमान ३७ ते ३९ अंशांच्या घरात पोहोचले आहे. मात्र किनारपट्टीवरील प्रचंड आर्द्रतेमुळे ‘फील लाइक’ तापमान ४२ अंशांपर्यंत जाणवत आहे. सकाळी ९ वाजल्यापासूनच अंग भाजणारे ऊन पडू लागते आणि दुपारी तर रस्ते अक्षरशः ओस पडतात. उन्हाच्या चटक्यामुळे डांबरी रस्त्यांवरून उष्णतेच्या लाटा उसळताना दिसत आहेत.

दुपारच्या सुमारास शहरांतील मुख्य रस्ते सुनसान दिसत आहेत. अलिबागसारख्या गजबजलेल्या शहरातही दुपारी नागरिक घराबाहेर पडणे टाळत आहेत. बाजारपेठांतील व्यवहारांवरही परिणाम झाला असून व्यापाऱ्यांना फटका बसत आहे. छोटे व्यावसायिक, फेरीवाले आणि मजूर वर्ग उष्णतेच्या तडाख्यात सर्वाधिक होरपळत आहेत.

उन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर बनला आहे. अनेक गावांतील विहिरी तळाला गेल्या असून बोअरवेल्सनीही दगा दिला आहे. परिणामी टँकरलॉबीचे चांदीचे दिवस आले आहेत. काही भागांत पाण्यासाठी महिलांना मैलोनमैल पायपीट करावी लागत आहे. पाण्याच्या टँकरसाठी भांडणे, वादविवाद यांचे प्रकार वाढू लागले आहेत.

उष्णतेच्या आजारात वाढ

उष्माघात, डिहायड्रेशन, चक्कर येणे, उलट्या, त्वचेचे आजार अशा तक्रारींनी दवाखाने भरू लागले आहेत. ग्रामीण भागात तर प्राथमिक आरोग्य केंद्रांवर मोठी गर्दी होत आहे. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि उन्हात काम करणारे मजूर यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. काही ठिकाणी उष्माघाताच्या घटनाही समोर येत असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक सरकारी रुग्णालयात उष्माघात कक्ष सज्ज ठेवण्यात आला आहे.

बागायतींवर परिणाम

रायगडची ओळख असलेला आंबा हंगामही या प्रखर उष्णतेने प्रभावित होत आहे. आंबा, काजू, भाजीपाला पिकांवर उन्हाचा परिणाम होत असून उत्पादन घटण्याची शक्यता आहे. पाण्याअभावी बागायती वाळण्याच्या मार्गावर आहेत. शेतकरी चिंतेत असून, आधीच खर्च वाढलेला असताना उत्पादन घटल्यास आर्थिक फटका बसणार आहे.

वीजपुरवठ्यावर ताण

उष्णतेमुळे पंखे, कूलर, एसी यांचा वापर वाढल्याने वीजेची मागणी प्रचंड वाढली आहे. काही भागांत लोडशेडिंगचे प्रमाण वाढल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. वीज खंडित झाल्यास उकाडा अधिकच असह्य होत असल्याने नागरिकांचा संताप वाढत आहे.

प्रशासनाच्या उपाययोजना अपुऱ्या?

जिल्हा प्रशासनाकडून पाणीपुरवठ्यासाठी टँकर सुरू करण्यात आले असले, तसेच नागरिकांना सतर्कतेच्या सूचना दिल्या जात असल्या तरी प्रत्यक्षात परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे चित्र आहे. अनेक गावांत अजूनही नियमित पाणीपुरवठा सुरळीत नाही. उष्णतेच्या लाटेचा सामना करण्यासाठी अधिक ठोस आणि तातडीच्या उपाययोजनांची मागणी होत आहे.

हवामान खात्याचा इशारा

पुढील काही दिवस उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी अत्यंत काळजी घेणे आवश्यक आहे.

एकूणच, रायगड जिल्हा सध्या प्रखर उन्हाच्या विळख्यात सापडला असून “सूर्यदेव कोपला, रायगड तापला” ही वस्तुस्थिती ठरली आहे. उष्णतेच्या या प्रकोपाने सामान्य नागरिकांपासून शेतकरी, कामगार, व्यापारी अशा सर्वच घटकांचे जीवन अक्षरशः होरपळून निघत आहे. परिस्थितीची तीव्रता पाहता तातडीने प्रभावी उपाययोजना न झाल्यास येणारे दिवस आणखी कठीण ठरणार, यात शंका नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT