रायगड ः किशोर सुद
गेली वर्षभरापासून सोन्याच्या दहा ग्रॅमच्या दरात सुमारे 47 हजारांची वाढ झालेली असतानाही नागरिकांकडून सुवर्ण खरेदीला पसंती दिली जात आहे. यावर्षी दसर्याच्या मुहूर्तावर सोने खरेदीला चांगला प्रतिसाद मिळाला असून रायगड जिल्ह्यात दसर्यानिमित्त सोने खरेदीत सुमारे 50 कोटींहून अधिक रुपयांची उलाढाल झाली असण्याची शक्यता सराफ बाजारातून व्यक्त करण्यात आली.
‘दसरा’ सण हा सर्वत्र देशभरात मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो. दसर्याच्या दिवशी सोनं खरेदी केलं तर घरात कायम भरभराट राहते अशी नागरिकांची भावना आहे. दसरा सणाचा मुहूर्त साधण्याकरता रायगड जिल्ह्यांतील सराफ दुकानांत सकाळपासूनच सोने खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी झाल्याचे पहायला मिळत होते.
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या विजयादशमीच्या मुहूर्तावर नागरिक सोन-चांदीची मोठ्या प्रमाणावर खरेदी करतात. गुरूवारी दसर्यानिमित्त रायगड जिल्ह्यातील बाजारपेठेत मोठी गर्दी करत सोनं-चांदीची खरेदी झाली. दसर्याच्या मुहूर्तावर सोनं खरेदीची परंपरा आहे. या दिवशी सोनं खरेदी शुभ मानलं जातं. त्यानुसार दसरा दिवशी जिल्ह्यातील बाजारपेठेत सोने-चांदीची नागरिक खरेदी करत होते. खरेदी करताना नागरिकांची सोन्या-चांदीच्या नाण्याला जास्त पसंती दिली जात होती.
आज सोन्याचा भाव एक लाख वीस हजार रूपयांवर गेला असे असले तरी दसर्या दिवशी सोनं खरेदी करण्याची लोकांची श्रद्धा जराही कमी झालेली नाही. दसर्याच्या मुहुर्तावर सोने-चांदीची खरेदी करण्यासाठी नागरिकांनी बाजार पेठेत मोठी गर्दी केली होती. शहरातील विविध दुकानांमध्ये लोक सोन्याची खरेदी करत होते.
दसर्याच्या मुहूर्तावर सोनं खरेदीचा कल आजच्या दिवशी जास्त दिसून आला. आजच्या दिवशी नागरिक दागिन्यांपेक्षा सोनं-चांदीचं नाणं, सोन्याची वेनी अशी गुंतवणुकीच्या दृष्टीनं खरेदी करत आहेत, अशी माहिती ज्वेलरी दुकानदारांकडून देण्यात आली. गेल्या वर्षभरात सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. तरी आज दसर्याच्या मुहूर्तावर सकाळपासून ग्राहकांचा सोने खरेदीसाठी चांगला प्रतिसाद होता. सायंकाळच्या सुमारास ग्राहक सोने खरेदीस बाहेर पडतात. सायंकाळनंतर ग्राहकांचा निश्चित प्रतिसाद कळून येतो.
मुहूर्ताच्या सोने खरेदीला नागरिक चुकत नाही. दसर्याच्या मुहूर्तावर नागरिक एक-दोन ग्राम सोन्याची खरेदी करतातच अशी माहिती ज्वेलरी शॉपमधून देण्यात आली. शासनाने मागील काळात जीएसटीमध्ये बदल केले आहेत.
मात्र सोन्यावरील जीएसटीत बदल केलेले नाहीत. सोन्यावर तीन टक्के जीएसटी कायम आहे. त्यामुळे सोन्याच्या दरावर जीएसटीचा काहीही परिणाम झालेला नाही, अशी माहिती सराफ बाजारातून देण्यात आली. दरम्यान, गुरुवारी (2 ऑक्टोबर) अलिबागमध्ये 24 कॅरेटच्या दहा ग्रॅम सोन्याचा दर 1 लाख 22 हजार 500 रुपये, 22 कॅरेटचा दहा ग्रॅमचा दर 1 लाख 9 हजार 351 होता. तर चांदीचा एक किलोचा दर 1 लाख 55 हजार रुपये इतका होता. अलिबाग तालुक्यात पन्नास तर रायगड जिल्हयात सुमारे एक हजार ज्वेलरी शॉप आहेत. दसर्याच्या निमित्त रायगड जिल्ह्यात सोने खरेदीत सुमारे 50 कोटींहून अधिकची उलाढाल झाली असण्याचा अंदाज ज्वेलर्सकडून व्यक्त केला जात आहे.
गेल्या वर्षभरात सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. तरी आज दसर्याच्या मुहूर्तावर सकाळपासून ग्राहकांचा सोने खरेदीसाठी प्रतिसाद होता. सायंकाळच्या सुमारास ग्राहक सोने खरेदीस बाहेर पडतात. सायंकाळनंतर ग्राहकांचा निश्चित प्रतिसाद कळून येतो. मुहूर्ताच्या सोने खरेदीला नागरिक चुकत नाही. त्यामुळे दसर्याच्या मुहूर्तावर नागरिक एक-दोन ग्राम सोन्याची खरेदी करतातच.रणजीत जैन, अध्यक्ष, अलिबाग तालुका ज्वेलर्स असोसिएशन