रायगडमध्ये लागले नववर्ष स्वागताचे वेध pudhari photo
रायगड

New Year celebrations in Raigad : रायगडमध्ये लागले नववर्ष स्वागताचे वेध

मुंबई-पुण्याच्या पर्यटकांचा सागरी किनारपट्टीत वाढता ओघ; जिल्ह्यातील 80 टक्के हॉटेलची बुकिंग फुल्ल

पुढारी वृत्तसेवा

अलिबाग : सुवर्णा दिवेकर

नाताळ सण साजरा करण्यासोबत सरत्या वर्षाला निरोप व नवीन वर्ष स्वागताचे वेध लागले आहेत. रायगड जिल्ह्यात मोठ्या संख्येने पर्यटक दाखल झाले असून, सर्व पर्यटन स्थळे पर्यटकांनी बहरली आहेत. ठीकठिकाणी मनोरंजनाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात व्यावसायिक व्यस्त आहेत. जिल्ह्यातील हॉटेलमध्ये 80 टक्के बुक असल्याने, आत्ता आयत्या वेळी बुकींग करण्यासाठी पर्यटकांना जादा पैसे मोजावे लागत आहेत.

अलिबाग तालुक्यातील अलिबाग, वरसोली, नागाव, आक्षी, रेवदंडा, किहीम, मांडवा याठिकाणी सुंदर आणि निसर्गाने नटलेले समुद्र किनारे आहेत. अलिबागमध्ये येणारा पर्यटक ह्या समुद्र किनाऱ्यावर गेल्या शिवाय राहत नाही. समुद्र स्नानाचा आनंद पर्यटक लुटत आहेत. त्याचबरोबर जलक्रीडा, ए टी वी बाईक, सायकल, घोडा, उंट सफारी याचाही आनंद घेत आहेत. अलिबाग समुद्रात असलेल्या कुलाबा किल्ल्यात जाऊन पर्यटक ऐतिहासिक वास्तूला भेट देत आहेत. किल्याचा इतिहास जाणून घेत आहेत.

अलिबागसह तालुक्यातील इतर समुद्र किनारी ही धमाल मस्ती पर्यटकांची सुरू आहे. त्याचबरोबर अलिबाग समुद्रात मिळणाऱ्या ताज्या मासळी वरही पर्यटक ताव मारत आहे. त्यामुळे तालुक्यातील हॉटेलात पर्यटकांची मांसाहार खाण्यास रीघ लागलेली आहे. समुद्र पर्यटनासह तालुक्यातील धार्मिक, प्रेक्षणीय स्थळांनाही पर्यटक भेटी देत आहेत.

पर्यटक मोठ्या संख्येने तालुक्यात दाखल झाल्याने स्थानिक व्यवसायिक यांनाही लाभ झाला आहे. समुद्र किनारी व्यवसाय करणारे, रिक्षा, सितारा व्यवसायिक, पापड, लोणची व्यवसायिक यांचाही पर्यटक येण्याने व्यवसाय तेजीत आहे. त्यामुळे पुढील आठ दिवस अलिबाग तालुक्यातील अर्थकारणात मोठी वाढ पर्यटकांमुळे होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT