गणेशोत्सवामुळे बाजारातील मंदीचे विघ्न दूर pudhari photo
रायगड

Raigad Ganeshotsav economic impact : गणेशोत्सवामुळे बाजारातील मंदीचे विघ्न दूर

रायगडमध्ये 80 कोटींची उलाढाल

पुढारी वृत्तसेवा

अलिबाग : बुद्धीची देवता असलेल्या गणपती बाप्पांचे आगमन म्हणजे सुख, समाधान आणि समृदधीचे प्रतिक मानले जाते. धार्मिकदृष्ट्या कोकणवासियांसाठी महत्त्वाचा असलेला गणेशोत्सव सामाजिक आणि आर्थिक उलाढालीचा महत्त्वाचा केंद्रबिंदू झाला आहे. यावर्षी गणेशोत्सव काळात केवळ रायगड जिल्ह्यातच 80 कोटींहून अधिक रुपयांची उलाढाल झाल्याचा अंदाज आहे. जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या छोट्या मोठ्या व्यावसायिकांना गणपतीबाप्पांनी खूप मोठा आर्थिक आधार देत मंदीचे विघ्न दूर केले आहे.

रायगड जिल्हयात दरवर्षी गणेशोत्सवात एक लाखांपेक्षा अधिक गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना केली जाते. जिल्ह्यात घरोघरी गणेशमूर्तीचे आगमन होत असल्याने उत्सव काळात भाविक आपल्या बाप्पांसाठी सढळ हस्ते खर्च करतात. गणेशमूर्ती, मखर सजावट, विद्युत रोषणाई, पूजा साहित्य, कपडे, वादन साहित्य, फळे, फुले, भाज्यांची खरेदी करण्यात येते. त्याचबरोबर, कपड्यांचीही खरेदी केली जाते.

नोकरी-व्यवसायासाठी मुंबई-पुणे आणि अन्य शहरात राहणारे कोकणवासीय गणेशोत्सवानिमित्त कोकणातील आपल्या गावी हमखास येतात. गावी येताना मोठ्या शहरातील नावीन्यपूर्ण वस्तू खरेदी करून येतात, परंतु तरीही स्थानिक बाजारात मोठया प्रमाणावर खरेदी केली जाते. या वर्षी तर ओवसे असल्यामुळे ओवशासाठी फळे, फराळाचे पदार्थ, सुपांची खरेदी मोठ्या प्रमाणात करण्यात आली. गणेशोत्सवाच्या तीन दिवस आधीपासूनच अलिबागसह महाड, माणगाव, पेणसारख्या मध्यवर्ती भागातील बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी अक्षरशः झुंबड उडाली होती.

दोन-तीन दिवस पावसाने हजेरी लावल्याने बाजारावर परिणाम झाला. मात्र, पावसाने विश्रांती घेताच, पुन्हा बाजारपेठेत खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केली होती. जिल्ह्यात लाखभर गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येते. प्रत्येक जण आवडीनुसार मूर्तीवर खर्च करतो. गणेशमूर्ती, आरास आणि सजावट, पूजा साहित्य, प्रसाद, पौरोहित्य, फुले, जिन्नस यासारखा प्रत्येक घरटी किमान पाच हजार रुपये खर्च गृहीत धरला तरी एवढ्याच गोष्टीतून 75 कोटी रुपयांची उलाढाल होते. याशिवाय बस, रेल्वे, रिक्षावाहतूक हा खर्च वेगळाच आहे.

  • जिल्ह्यात सार्वजनिक गणेशोत्सवांची संख्या कमी असली तरी मंडप, सजावट यावरही मोठा खर्च केला जातो. त्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. शिवाय ढोलताशा पथक, खालूबाजा, विद्युत रोषणाई यामुळे गणेशोत्सव काळात एकट्या रायगड जिल्ह्यातच 80 कोटींपेक्षा अधिक उलाढाल झाली असल्याचे समोर येते.

कपड्यांवर विशेष खर्च

अलीकडे उत्सव काळात एक रंग, एकच डिझाइनच्या कपड्यांना मागणी वाढली आहे. सण, उत्सव, धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमात लहानांपासून मोठ्यांपर्यंत एकाच रंगाची, एकाच प्रकारच्या वेशभूषेला महत्त्व दिले जात आहे. त्यामुळे विसर्जन सोहळ्यासाठी शहरातच नव्हे, तर ग्रामीण भागात एकाच प्रकारचे, डिझाइनचे कपडे खरेदी करण्यात आले होते. त्यामुळे कपड्यांवर विशेष खर्च करण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT