

ठाणे : नवी मुंबईमध्ये भाजपला एकहाती सत्ता मिळवून दिल्यानंतर आता राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी ठाण्यातही पक्ष वाढीसाठी कंबर कसली आहे. नुकत्याच झालेल्या एका बैठकीत त्यांनी ठाणे महानगरपालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यातच त्यांना अप्रत्यक्षपणे डिवचले आहे. ‘जर ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या अहंकाराचे दहन करावे लागेल. त्यासाठी तुम्ही तयार आहात का?’ असा सवाल करत नाईक यांनी कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांमध्ये जोश भरला.
ठाण्यातील भाजपच्या जिल्हा कार्यालयात ‘सेवा पंधरवडा’ निमित्त आयोजित बैठकीत नाईक बोलत होते. यावेळी त्यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या संभाव्य युतीच्या निर्णयावरही भाष्य केले. ‘जर पक्षाने वरिष्ठ पातळीवर युतीचा आग्रह धरला आणि त्या युतीच्या बोलणीत आपला सन्मान राखला गेला नाही, तर त्या युतीला पहिला विरोध करणारा मी असेन,’ असे स्पष्ट संकेत देत नाईकांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेसोबतच्या संभाव्य युतीवर आपला संशय व्यक्त केला.
या बैठकीला भाजपचे आमदार निरंजन डावखरे, जिल्हाध्यक्ष संदीप लेले, काही माजी नगरसेवक आणि प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. गेल्या काही महिन्यांपासून गणेश नाईक जनता दरबाराच्या माध्यमातून ठाण्यात भाजपची ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे मंगळवारच्या बैठकीत त्यांनी शिवसेनेला पुन्हा एकदा डिवचल्याने भविष्यात भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेत संघर्ष वाढण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.
गणेश नाईक यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी नाईक यांच्या वक्तव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ‘रावण कोण? मला वाटत नाही की ठाण्यातील सत्ताधारी नेते त्यांना रावण म्हणण्याची हिंमत दाखवतील. राम कोण होणार? रावणाचे दहन करायला रामाला यावे लागेल, मग तो राम कोण? मांडीला मांडी लावून सत्तेत बसायचे, मलाई खायची आणि जनतेसमोर उगाच डोळे दाखवायचे हे हास्यास्पद आहे,’ अशा शब्दांत आव्हाड यांनी भाजप आणि शिंदे गटावर निशाणा साधला.
याउलट, ठाकरे गटाचे माजी खासदार राजन विचारे यांनी मात्र नाईकांचे समर्थन केले आहे. ‘गणेश नाईक यांनी केलेले वक्तव्य चुकीचे नाही, ते बरोबरच बोलले आहेत,’ असे मत व्यक्त करत विचारे यांनी अप्रत्यक्षपणे एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली.