सुवर्णा दिवेकर
अलिबाग: गणरायाचे आगमन १४ सप्टेंबर रोजी घरोघरी होणार असल्याने गणेशोत्सवाच्या तयारीला आता वेग आला आहे. गणेशोत्सवाला अवघे २५ दिवस शिल्लक राहिल्याने रायगड जिल्ह्यातील गावागावांमध्ये गणेशमूर्तीच्या रंगकामाची लगबग सुरू झाली आहे.
कच्च्या मूर्तींना पॉलीश करण्यापासून त्यांना आकर्षक रंग देणे, रंगसंगती करणे, नक्षीकाम करणे तसेच अंतिम रूप देण्याची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. या माध्यमातून अनेक गावांतील स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या असून महिला वर्गाचाही या कामात मोठा सहभाग दिसून येत आहे.
रायगड जिल्ह्यातील पेण तालुका गणेशमूर्ती निर्मितीसाठी देशभरात प्रसिद्ध आहे. पेणच्या गणेशमूर्ती आकर्षक, रेखीव आणि कलात्मक असल्याने पेणकडे गणेशमूर्ती तयार करण्याचे माहेरघर म्हणून पाहिले जाते. रायगड जिल्ह्यासह महाराष्ट्रातील विविध भागांत तसेच देशाच्या अन्य राज्यांमध्ये आणि परदेशातही पेणच्या गणेशमूर्तींना मोठी मागणी असते. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काही महिने आधीपासूनच मूर्तिकारांकडून मूर्ती तयार करण्याचे काम सुरू होते.
अलिबाग तालुक्यातील अनेक गावांमध्येही गणेशमूर्ती तयार करण्याच्या कार्यशाळा आहेत. या कार्यशाळांमध्ये दरवर्षी हजारो गणेशमूर्ती तयार केल्या जातात. येथील काही मूर्तींना परराज्यांसह परदेशातूनही मागणी असल्याने स्थानिक मूर्तिकारांना मोठी बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. गणेशभक्तांच्या आवडीनुसार विविध आकार, प्रकार आणि आकर्षक स्वरूपातील मूर्ती तयार केल्या जात आहेत.
सध्या अलिबाग तालुक्यातील विविध गावांमध्ये गणेशमूर्तींना रंग देण्याचे काम वेगाने सुरू झाले आहे. ग्राहकांच्या मागणीनुसार शाडूच्या मातीच्या तसेच प्लास्टरच्या मूर्ती कार्यशाळांमधून आणून त्यांना अंतिम स्वरूप देण्याचे काम गावागावात केले जात आहे. मूर्तींना पॉलीश करणे, बेस कोट देणे, विविध रंगांची रंगसंगती करणे, डोळे व चेहऱ्यावरील बारकावे उठावदार करणे, दागदागिने आणि वस्त्रांना आकर्षक रंग देणे, नक्षीकाम करणे आदी कामांमध्ये कारागीर व्यस्त झाले आहेत.
विशेषतः अलिबाग तालुक्यातील खारेपाट विभागात गणेशमूर्ती रंगविण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरू झाले आहे. हाशिवरे येथील सिद्धार्थ कला केंद्रात विविध आकारांच्या गणेशमूर्तींना रंगकाम करण्याचे काम सुरू असून, परिसरातील तसेच इतर भागांतील गणेशभक्तांकडून मूर्तींची मागणी वाढत असल्याचे चित्र आहे. गणेशमूर्तींची बुकिंगही सुरू झाली असून, ग्राहकांच्या पसंतीनुसार मूर्ती तयार करून देण्यावर मूर्तिकारांचा भर आहे.
मूर्तींना पॉलीश करणे, रंगकाम करणे आणि सजावटीची विविध कामे करण्यासाठी स्थानिकांना रोजगार मिळत आहे. विशेष म्हणजे या कामात महिलांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग आहे. घरातील इतर कामे सांभाळून अनेक महिला गणेशमूर्ती रंगविण्याच्या कामात हातभार लावत आहेत.
शाडूच्या मूर्तींना अधिक पसंती
“खारेपाट विभागामध्ये गणेशभक्तांच्या आवडीप्रमाणे गणेशमूर्ती बनवून द्याव्या लागतात. त्यामुळे शक्यतो शाडूच्या मातीच्या मूर्तींना अधिक पसंती दिली जाते. गणेशभक्तांच्या आवडीनुसार मूर्ती तयार केल्या जात असून यावेळी पौराणिक चित्रांवर आधारित मूर्तींना मोठी मागणी आहे. विविध भागांतून मूर्तींसाठी बुकिंग होत आहे,” अशी माहिती हाशिवरे येथील मूर्तिकार सिद्धार्थ मोकल यांनी दिली.
गणेशोत्सव जवळ येत असल्याने पुढील काही दिवसांत मूर्तींच्या रंगकामाला आणखी वेग येणार आहे. गणेशमूर्तींच्या निर्मितीपासून रंगकाम, सजावट, वाहतूक आणि विक्रीपर्यंत विविध स्तरांवर स्थानिकांना रोजगार मिळत असल्याने ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही या उत्सवाचा हातभार लागत आहे. त्यामुळे ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषासोबतच मूर्तिकार आणि कारागिरांच्या हाताला काम मिळाल्याचे समाधानाचे चित्र रायगड जिल्ह्यात दिसून येत आहे.