नाते : इलियास ढोकले
हिंदवी स्वराज्याची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडाचे ऐतिहासिक संवर्धन त्याच पद्धतीने करण्याच्या विचाराशी ठाम राहत रायगड प्राधिकरणा मार्फत किल्ले रायगड येथे सुरू असलेल्या तलावाच्या कामानंतर आता महत्त्वाच्या तटबंदीच्या जतन कामास सुरुवात करण्यात आल्याची माहिती रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष संभाजी राजे छत्रपती यांनी दिली आहे.
दुर्गराज रायगडचा अत्यंत महत्त्वाचा भाग असलेल्या महादरवाजालगतच्या तटबंदीचे जतन व संवर्धनाचे काम रायगड विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून नुकतेच सुरू करण्यात आले असून या विषयाचे अधिकृत माहिती युवराज छत्रपती संभाजीराजे यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंट वरून देण्यात आली आहे.
या उपक्रमांतर्गत महादरवाजापासून टकमक टोकापर्यंतच्या तटबंदीचा समावेश असून, ऐतिहासिक वारशाच्या संरक्षणासाठी महत्त्वाची पावले उचलली जात आहेत.पुरातत्व विभागाच्या मंजुरीने सुरू असलेल्या या कामांपैकी महादरवाजा ते हिरकणी बुरुजा दरम्यानच्या तटबंदीचे जतनसंवर्धनाचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे. सध्या संपूर्ण परिसराचे प्रथम सखोल दस्तऐवजीकरण करण्यात आले असून, त्या दस्तऐवजीकरणात निदर्शनास आलेल्या जतनसंवर्धनात्मक बाबींनुसार पुढील कामे सुरू करण्यात आली आहेत.
तटबंदीच्या भिंतींवर साचलेला मातीचा व ढिगाऱ्याचा थर काढणे (डेब्रिस क्लीअरन्स) तसेच भिंती जलरोधक (वॉटरटाइटिंग) करण्याचे काम सुरू आहे. ही सर्व कामे चुना, बेलफळ, सुर्खी व दगड यांसारख्या पारंपारिक बांधकाम साहित्याचा वापर करून करण्यात येत असून, किल्ल्याच्या मूळ बांधकाम शैलीचे जतन केले जात आहे तसेच तटबंदीचा एक महत्त्वाचा भाग असलेल्या चिलखती बुरुजावर साचलेला ढिगारा व झाडेझुडपे हटविण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे.या प्रक्रियेदरम्यान बुरुजाच्या फ्लोरिंग लेव्हल्स तसेच भिंतींमध्ये असलेली गन पॉईंट्सची अनोखी व वैशिष्ट्यपूर्ण शृंखला उजेडात आली असून, त्यांचे लवकरच जतनसंवर्धन करण्यात येणार आहे. या जतन संवर्धनामुळे पावसाच्या पाण्यामुळे तटबंदीच्या बांधकामाला होणारे नुकसान रोखण्यास मदत होणार आहे. रायगड प्राधिकरणामार्फत सुरू करण्यात आलेल्या या संवर्धनाबाबत गडप्रेमी व शिवप्रेमींकडून समाधान व्यक्त केले जात आहे.