Raigad Fort news
नाते : इलियास ढोकले
छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर विविध ठिकाणी ५० पेक्षा जास्त दारूच्या रिकाम्या बाटल्या आढळून आल्याने शिवप्रेमी आणि नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. ऐतिहासिक आणि पवित्र मानल्या जाणाऱ्या गडावर अशा प्रकारचे प्रकार घडत असल्याने “गडावर नेमकं चाललंय तरी काय?” असा सवाल आता उपस्थित केला जात असून या संदर्भात केंद्रीय पुरातत्व विभागामार्फत संबंधितांविरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणी शिवभक्तांकडून करण्यात येत आहे.
गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पर्यटक रायगडावर भेट देत आहेत. मात्र काही पर्यटकांकडून गडाच्या पावित्र्याला गालबोट लावणारे प्रकार होत असल्याचे समोर आले आहे. गडावरील एमटीडीसीच्या असणाऱ्या रूमच्या जवळ तसेच राणी वसाच्या मागे व विविध ठिकाणी दारूच्या बाटल्या, प्लास्टिक कचरा तसेच अस्वच्छता आढळून येत असल्याने शिवभक्तांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
स्थानिक नागरिक आणि इतिहासप्रेमींच्या मते, गडावर सुरक्षा व्यवस्था आणि नियंत्रण यंत्रणा अत्यंत अपुरी पडत आहे. गडाच्या प्रवेशद्वारांवर काटेकोर तपासणी होत नसल्याने काही जण दारूच्या बाटल्या घेऊन गडावर जात असल्याचा आरोप केला जात आहे. “पुरातत्व विभाग नेमकं करतंय काय?” असा प्रश्न आता शिवप्रेमी विचारत आहेत.
गडाचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता प्रशासनाने तातडीने कठोर पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे. गडावर सीसीटीव्ही व्यवस्था वाढवणे, सुरक्षारक्षकांची संख्या वाढवणे, दारूबंदीचे फलक लावणे तसेच नियम तोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृतींशी जोडलेल्या रायगडाचे पावित्र्य जपणे ही प्रत्येकाची जबाबदारी असून केंद्रीय पुरातत्व विभागामार्फत किल्ले रायगडावर असणाऱ्या यंत्रणांकडून अशा मद्यपी विरोधात कठोर कारवाई करावी तसेच स्थानिक पोलीस प्रशासनानेही याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.