श्रीकृष्ण बाळ
महाड : किल्ले रायगडाच्या ऐतिहासिक हिरकणी बुरुजावरून आपल्या लाडक्या बाळाच्या ओढीने रायगडाचा उंच आणि धोकादायक कडा उतरून खाली जाण्याचे धाडस करणाऱ्या हिरकणी गवळणीची गोष्ट सर्वश्रुत आहे. छत्रपती शिवरायांच्या काळाच्या इतिहासामध्ये सर्वांनीच ऐकली आहे. अशा या हिरकणीच्या नावाने प्रसिद्ध असलेल्या हिरकणी बुरुजाचे आता रायगड विकास प्राधिकरणामार्फत संवर्धन केले जाणार आहे.
दुर्गराज रायगडावरील अनेक वास्तूंप्रमाणे हिरकणी बुरुज या रायगडाच्या ऐतिहासिक बुरुजाचेही काळानुसार मोठे नुकसान झालेले होते व बुरुजाची बांधणी कमकुवत झालेली होती. भारतीय पुरातत्व विभागाच्या परवानगीने रायगड विकास प्राधिकरणाने हिरकणी बुरुजाचे संवर्धन कार्य हाती घेतलेले असून या कामांतर्गत प्रामुख्याने बुरुजातील लष्करी वास्तुशास्त्रीय घटकांचे पुनरुज्जीवन करण्यात येत आहे. बुरुजाच्या मूळ दगडांच्या रचनेचा अभ्यास करून बुरुजाची पुनर्रचना करण्यात येत आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात विशेषत: चर्या, जंग्या, टेहाळणीची पुनर्रचना तसेच मुख्य भिंत व बुरुजामध्ये सैन्याच्या हालचालींसाठी असलेला पारंपरिक मार्ग या घटकांचे संवर्धन व मजबुतीकरणाचे काम सुरू आहे. पावसाळ्यात पाणी बांधकामात झिरपत असते.
वर्षानुवर्षे ही प्रक्रिया सुरू असल्यामुळे कालानुरूप बांधकाम कमकुवत होत असते. ऐतिहासिक वास्तू व बांधकाम ढासळण्यामागचे हे एक मोठे कारण आहे. हे सर्व टाळण्यासाठी पुढील टप्प्यात बुरुजाच्या भिंतींच्या वरील पृष्ठभागास पारंपरिक बांधकाम साहित्य वापरून जलरोधक करण्यात येणार आहे, ज्यामुळे पावसाचे पाणी या बांधकामात उतरण्यास प्रतिबंध करण्यात येईल. एक आई आपल्या बाळाच्या प्रेमापोटी केवढे मोठे धाडस करू शकते याचे उदाहरण हिरकणी गवळणीने दाखवून दिलेले आहे.