Mahasadra River Danger Level
कोलाड : कोलाड परिसरात गेल्या चार ते पाच दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे महिसदरा नदीने सलग दुसऱ्या दिवशीही धोक्याची पातळी ओलांडली आहे. मुंबई-गोवा महामार्गालगत पुई गावाजवळून वाहणाऱ्या या नदीचे पुराचे पाणी गोवे गावाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर आल्याने गावाचा बाह्य संपर्क पूर्णपणे तुटला आहे.
पुराच्या पाण्यामुळे गोवे गावासह समर्थनगर, बौद्धवाडी आणि परिसरातील काही घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच भातशेतीही पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
दरम्यान, महिसदरा नदीबरोबरच कुंडलिका आणि गोदी या नद्यांनीही धोक्याची पातळी ओलांडली असून तिन्ही नद्या दुथडी भरून वाहत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून गोवे गावाला पुराच्या पाण्याचा वेढा पडला असून गावाकडे जाणारा रस्ता अद्यापही बंद आहे.
रस्ते बंद झाल्यामुळे धाटाव एमआयडीसीमध्ये कामासाठी जाणारे कामगार तसेच कोलाड बाजारपेठेत ये-जा करणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून अनेकांना घरीच थांबावे लागले आहे.
सोमवारी (दि. ६) पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहावे, अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.