Raigad Flood Pudhari
रायगड

Raigad Flood: रायगड जिल्ह्यात पावसाचे तांडव! जनजीवन पूर्णपणे विस्कळीत

महाड आणि रोह्यात नद्यांना पून्हा महापूर

पुढारी वृत्तसेवा

महाड/रोहा: रायगड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने बुधवारी संपूर्ण जिल्ह्याला झोडपून काढले आहे. महाड आणि रोहा तालुक्यात पावसाचे थैमान सुरूच असून, प्रमुख नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे दोन्ही शहरांसह ग्रामीण भागाला महापुराचा वेढा पडला आहे.

गेल्या २० वर्षांत पहिल्यांदाच महाडमध्ये सलग चार दिवसांत तीनवेळा पूर आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे, तर रोहा आणि अष्टमी शहराचा संपर्क तुटल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत.

महाडमध्ये चार दिवसांत तिसऱ्यांदा पूर; बाजारपेठेत पाणी

जून महिन्यात लांबलेल्या पावसाने जुलैच्या पहिल्या आठवड्यात जोरदार दणका दिला आहे. महाड तालुक्यातील सावित्री, काळ आणि गांधारी या तिन्ही नद्या दुथडी भरून वाहत आहेत. मंगळवारी रात्री झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे बुधवारी पहाटे महाड शहरात पुन्हा पुराचे पाणी शिरले.

सखल भागासह मुख्य बाजारपेठ जलमय झाल्याने व्यापारी आणि नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांनी केलेला पेरणीचा पेरा वाहून जाण्याची भीती व्यक्त होत आहे.

परिस्थितीचे गांभीर्य ओळखून प्रशासनाने शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली असून, नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, महाड-मुंबई राष्ट्रीय महामार्ग काल दुपारपासून पूर्ववत झाला असला, तरी आंबेनळी, भोर आणि ताम्हिणी घाट बंद झाल्याने दूध व भाजीपाल्याची आवक ठप्प झाली आहे. परिणामी, महाडमध्ये भाजीपाल्याचे भाव कडाडण्याची शक्यता आहे.

रोह्यात कुंडलिका-अंबा नदीला पूर; अष्टमी शहर पाण्याखाली

दुसरीकडे, रोहा तालुक्यातही रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे कुंडलिका आणि अंबा नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली. कुंडलिका नदीचे पाणी अष्टमी शहरात आणि रोहा शहराच्या काही भागात शिरल्याने संपूर्ण परिसर जलमय झाला आहे.

रोहा-अष्टमीला जोडणारा जुना पूल पाण्याखाली गेला असून, मोठ्या पुलाच्या दोन्ही बाजूंना पाणी आल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. यामुळे मुंबई, अलिबाग, नागोठणे आणि पालीकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. तसेच, रोहा-कोलाड मार्ग बंद असल्याने तळकोकणात जाणारे प्रवासी अडकून पडले आहेत.

धाटाव औद्योगिक क्षेत्राकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाणी आल्याने कामगारांना कंपन्यांमध्ये जाता आले नाही, तर रेल्वे स्थानकाकडे जाणारे रस्तेही बंद असल्याने रेल्वे प्रवाशांचे हाल झाले. शहरांमधील दमखाडी, भुवनेश्वर आणि रोठखुर्द नागरी वस्तीत पाणी शिरल्याने जनजीवन पूर्णपणे कोलमडले आहे.

युद्धपातळीवर बचावकार्य; प्रशासन सतर्क

महाड आणि रोहा दोन्ही ठिकाणी स्थानिक प्रशासन, पोलीस आणि बचाव पथके रात्रभर कार्यरत होती. महाडमध्ये एनडीआरएफचे पथक आधीच दाखल झाल्याने आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत पोहोचवणे शक्य झाले.

तर रोह्यामध्ये नगराध्यक्ष वनश्री शेडगे, उपनगराध्यक्ष अहमद दर्जी, मुख्याधिकारी अजयकुमार एडके, पोलीस निरीक्षक मारुती पाटील आणि नायब तहसीलदार राजेश थोरे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीवर नियंत्रण ठेवले. नगराध्यक्षांनी स्वतः बोटीतून जात अष्टमी शहरातील पूरपरिस्थितीची पाहणी केली. एसव्हीएसएसआर, एनव्हीएसएसआर आणि स्थानिक सामाजिक संस्थांच्या मदतीने अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

तटकरे कुटुंबियांचे पूरपरिस्थितीवर बारीक लक्ष

खासदार सुनील तटकरे, मंत्री आदिती तटकरे आणि आमदार अनिकेत तटकरे हे जिल्ह्यातील पूरपरिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या असून, पुरात अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी तातडीने बोटींची व्यवस्था केली आहे.

तसेच पूर ओसरताच तातडीने नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश त्यांनी दिले असून नगरपरिषद, वीज मंडळ, आपत्ती व्यवस्थापन, महसूल, पोलीस आणि आरोग्य यंत्रणेला २४ तास सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. पुढील ४८ तास हवामान खात्याने मुसळधार पावसाचा इशारा दिल्याने स्थानिक प्रशासनाने जनतेला सावधानतेचा इशारा दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT