World Bee Day Pudhari
रायगड

World Bee Day: रासायनिक शेतीला फाटा देत पनवेलच्या शेतकऱ्याने मधमाशी पालनातून साधली शेतीची समृद्धी

जागतिक मधमाशी दिन विशेष

पुढारी वृत्तसेवा

जयंत धुळप

रायगड: निसर्गातील अत्यंत महत्त्वाचा घटक असलेल्या मधमाशा केवळ डंक मारणारा कीटक नसून शेतकऱ्यांचा खरा सोबती आहे. हेच सिद्ध करून दाखवले आहे रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील गुळसुंदे गावचे प्रयोगशील शेतकरी आणि राज्य कृषिभूषण' पुरस्कार विजेते  मिनेश गाडगीळ यांनी आजच्या  'जागतिक मधमाशी दिना'चे औचित्य साधत त्यांनी शेती उत्पादनात मधमाश्यांच्या परागीभवनाचे (पाॅलिनेशन) असणारे वैज्ञानिक महत्त्व आणि त्यातून मिळणारे अतिरिक्त उत्पन्न यावर प्रकाश टाकला आहे.

परागीभवनामुळे 'पोच भाता'ची समस्या मिटली

भात शेतीमध्ये अनेकदा परागीभवन व्यवस्थित न झाल्यामुळे धान्याचा दाणा भरत नाही, ज्याला स्थानिक भाषेत 'पोच भात' म्हणतात. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. मात्र, गाडगीळ यांनी आपल्या शेतात मधमाशांची पेटी ठेवल्यापासून आश्चर्यकारक बदल पाहायला मिळाला. मधमाश्यांमुळे शेतातील परागीभवन उत्तम रीतीने झाल्याने पोच भाताचे प्रमाण लक्षणीयरीत्या घटले असून भाताचे उत्पादन वाढले आहे, असा अनुभव त्यांनी सांगीतला.

महाराष्ट्रातील अल्प प्रमाण आणि व्यावसायिक संधी

सध्या देशातील एकूण मधमाशी पालनापैकी तब्बल ७० टक्के व्यवसाय बिहार, पंजाब, हिमाचल प्रदेश आणि हरियाणा या राज्यांमध्ये केला जातो, तर महाराष्ट्रात हे प्रमाण केवळ १.३८ टक्के इतकेच आहे.

मधमाशी पालनाकडे शेतकऱ्यांनी व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहणे गरजेचे आहे. एका पेटीपासून वर्षाला साधारण ५ किलो तर राणी माशीच्या ३ ते ४ वर्षांच्या कार्यकाळात एकूण १५ ते २० किलो शुद्ध मध सहज मिळू शकतो, जो आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी असून बाजारपेठेत त्याला मोठी मागणी आहे.

रंगीबेरंगी तांदूळ आणि फळांची यशस्वी लागवड

मिनेश गाडगीळ हे त्यांच्या शेतातील नावीन्यपूर्ण प्रयोगांसाठी ओळखले जातात. त्यांनी आपल्या शेतात ग्रीन, ब्ल्यू, पर्पल, रेड आणि ब्लॅक बर्मा अशा वेगवेगळ्या रंगांच्या तांदळाची (पिगमेंटेड राईस) यशस्वी लागवड केली आहे. याशिवाय स्ट्रॉबेरी, ड्रॅगन फ्रूट आणि आकर्षक रंगीबेरंगी कलिंगडांचे उत्पादनही ते घेत आहेत.

शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहनराज्यात मधमाशी पालन व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने 'मधाचे गाव' योजना, प्रशिक्षण आणि जनजागृती मेळावे आयोजित केले जातात. तसेच २०२३ पासून 'मधुमित्र' आणि 'मधुसखी' पुरस्कारही दिले जात आहेत. निसर्ग संवर्धन, ग्रामीण रोजगार आणि कृषी पर्यटनाला (Agri-Tourism) चालना देण्यासाठी कोकणातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या पूरक व्यवसायाकडे वळावे, असे आवाहन देखील गाडगीळ यांनी  या निमित्ताने केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT