श्रीकृष्ण बाळ
महाड : दुर्गराज रायगड येथे ६ जून रोजी पार पडलेल्या ३५३ व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यादरम्यान, नैसर्गिक विधीसाठी गेलेल्या शिवभक्तांचे अनधिकृत ड्रोनद्वारे चित्रीकरण करून ते समाजमाध्यमांवर प्रसारित करण्यात आले.
या गंभीर प्रकाराची दखल घेत, अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे अध्यक्ष फत्तेसिंह सावंत यांनी संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करून कठोर कारवाईची मागणी केली आहे. यासंदर्भात श्री. सावंत यांनी महाडचे डीवायएसपी शंकर काळे यांची भेट घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षकांना उद्देशून लेखी निवेदन सादर केले.
नेमका प्रकार काय?
निवेदनात नमूद केल्यानुसार, रायगड किल्ल्यावर मर्यादित पायाभूत सुविधा असल्याने आणि भाविकांच्या प्रचंड गर्दीमुळे उपलब्ध शौचालयांची संख्या अपुरी पडली. परिणामी, अनेक भाविकांना आडोशाला जाऊन नैसर्गिक विधी करावा लागला. या परिस्थितीचा फायदा घेत लौकिक गोळे या व्यक्तीने ड्रोनच्या माध्यमातून हे चित्रीकरण केले आणि ते समाजमाध्यमांवर व्हायरल केले. या कृत्यामुळे संबंधित नागरिकांच्या गोपनीयतेचा आणि प्रतिष्ठेचा गंभीर भंग झाला असून, लाखो शिवभक्तांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. तसेच, युनेस्को जागतिक वारसा स्थळ असलेल्या रायगड किल्ल्याची आणि महोत्सव समितीची जाणीवपूर्वक बदनामी करण्यात आल्याचे निवेदनात म्हटले आहे.
कायदेशीर कारवाईची मागणी: फत्तेसिंह सावंत यांनी निवेदनात खालील कायदेशीर मागण्या केल्या आहेत:
कलम नुसार कारवाई: भारतीय न्यायसंहिता कलम २९४ (अश्लील मजकूर प्रसारित करणे), माहिती तंत्रज्ञान कायदा (IT Act) कलम ६६ (गोपनीयतेचे उल्लंघन) आणि कलम ६७ (अश्लील सामग्री प्रकाशित करणे) अंतर्गत लौकिक गोळे याच्यावर तातडीने गुन्हा दाखल करावा.
ड्रोनची चौकशी: चित्रीकरणासाठी वापरण्यात आलेल्या ड्रोनची मालकी, त्याची अधिकृत नोंदणी आणि उड्डाणाची वैधता यासंदर्भात सखोल चौकशी करावी.
डिजिटल पुरावे: संबंधित व्हिडिओ त्वरित समाजमाध्यमांवरून हटवावेत आणि सर्व डिजिटल पुरावे जप्त करून त्यांचे फॉरेन्सिक परीक्षण करावे.
प्रतिबंधात्मक कारवाई: या प्रकरणात सहभागी असणाऱ्या सर्व व्यक्तींची ओळख पटवून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी आणि संबंधित व्यक्तीला (लौकिक गोळे) रायगडवर प्रवेशबंदी करावी. तसेच, भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रशासनाने कडक उपाययोजना कराव्यात.