रायगड जिल्ह्यात 421 सर्पदंश रुग्णांवर यशस्वी उपचार Pudhari File Photo
रायगड

Raigad Snakebite Cases : रायगड जिल्ह्यात 421 सर्पदंश रुग्णांवर यशस्वी उपचार

जिल्हा रुग्णालयाची तत्पर सेवा ठरली जीवनदायी,अनेकांचे वाचले प्राण

पुढारी वृत्तसेवा

अलिबाग ः रायगड जिल्ह्यात मागील वर्षात सर्पदंशाच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात एकूण 421 सर्पदंशग्रस्त रुग्ण उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल झाले होते. यापैकी बहुतांश रुग्णांवर वेळेवर आणि प्रभावी उपचार करण्यात आल्यामुळे त्यांना जीवदान मिळाले असून ते पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. मात्र, दुर्दैवाने उपचारादरम्यान दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

पावसाळ्याच्या काळात शेतकाम, जंगलालगतची वस्ती, तसेच घराभोवती वाढलेली झुडपे यामुळे सर्पदंशाच्या घटनांमध्ये वाढ होते. रायगड जिल्ह्यातील ग्रामीण आणि दुर्गम भागात सापांचा वावर अधिक असल्याने या कालावधीत सर्पदंशाच्या घटना वाढल्या. जिल्हा रुग्णालय प्रशासनाने या पार्श्वभूमीवर सर्पदंश रुग्णांसाठी विशेष व्यवस्था उभारली होती.

जिल्हा रुग्णालयात सर्पदंश उपचारासाठी आवश्यक असलेले अँटी-स्नेक व्हेनम (), आपत्कालीन औषधे, तसेच प्रशिक्षित डॉक्टर व परिचारिका 24 तास उपलब्ध ठेवण्यात आले होते. रुग्ण दाखल होताच तातडीने प्राथमिक तपासणी, आवश्यक चाचण्या आणि उपचार सुरू करण्यात आले. यामुळे अनेक रुग्णांची प्रकृती गंभीर होण्यापूर्वीच नियंत्रणात आणण्यात यश आले.

सर्पदंशानंतर पहिल्या काही तासांत उपचार मिळणे अत्यंत महत्त्वाचे असते. ज्या रुग्णांना वेळेवर रुग्णालयात दाखल करण्यात आले, त्यांची प्रकृती लवकर सुधारली. काही प्रकरणांमध्ये मात्र रुग्ण उशिरा दाखल झाल्यामुळे गुंतागुंत वाढली आणि त्यातून दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

आरोग्य विभागाने नागरिकांना सर्पदंश झाल्यास घरगुती उपाय किंवा अंधश्रद्धांवर विश्वास न ठेवता तात्काळ नजीकच्या शासकीय रुग्णालयात जाण्याचे आवाहन केले आहे. तसेच रात्रीच्या वेळी टॉर्चचा वापर, घराभोवती स्वच्छता, झुडपे काढणे आणि पायात चप्पल किंवा बूट घालणे अशा खबरदारीच्या उपाययोजना करण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.

  • जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या तत्पर सेवेमुळे मोठ्या प्रमाणात सर्पदंशग्रस्त रुग्णांचे प्राण वाचले आहेत. ही बाब आरोग्य व्यवस्थेच्या कार्यक्षमतेचे आणि समर्पित सेवेचे उत्तम उदाहरण ठरत असून, भविष्यातही अशाच प्रकारे सज्जता ठेवण्याचा निर्धार प्रशासनाने व्यक्त केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT