

वढाव ः प्रकाश माळी
पेण तालुक्यातील शहापाडा ग्रामीण पाणी पुरवठा योजनेत कृत्रिम पाणी टंचाई निर्माण करून वाशी-शिर्की खारेपाट परिसरावर तीन दिवस आड येणारे पिण्याचे पाणी आत्ता सात दिवस आड पाणी पुरवठा लादण्यात आल्याने संतापाची लाट उसळली आहे.
शहापाडा ग्रामीण पाणी पुरवठा अंतर्गत समाविष्ठ गाव-परिसरांत जी “पाणीटंचाई” दाखवली जात आहे, ती वास्तवात नैसर्गिक किंवा तांत्रिक नसून मानव निर्मित व कृत्रिम आहे, हे वस्तुस्थिती पाहणाऱ्या, या विषयांत भाग घेतलेल्या प्रत्येकाला स्पष्ट दिसत आहे.
खारेपाटातली पाणी टंचाई व तीन दिवस आड होणारा पाणीपुरवठा नियमित होवून नागरीकांना रोजच्यारोज पाणी पुरवठा व्हावा म्हणून हेटवणे धरण ते शहापाडा धरण वाढीव उद्भव पाणीपुरवठा योजना सुमारे 29 कोटी 38 लाख रुपये खर्च करून राबवली गेली होती. आज अधिकृतरीत्या सांगितले जाते की या योजनेचे काम 100% पूर्ण झाले आहे, पण प्रत्यक्षात काय झाले? तर तीन दिवस आडचा पाणी पुरवठा सुधारण्या ऐवजी सात दिवस आड करण्यात आला आहे.
हेटवणे धरण ते शहापाडा वाढीव उद्भव पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून दरदिवशी 6 एम एल डी पाणी शहापाड्याला पोहचते तरी शहापाडा धरणात पाणीसाठा कमी का झाला ? असा सवाल पेण खारेपाट विकास संकल्प संघटनेने विचारला आहे. शहापाडा ग्रामीण पाणी पुरवठा, जिल्हा परिषद रायगड उपविभाग पेण यांनी संबंधित ग्रामपंचायतींना निर्गमित केलेल्या अधिकृत पत्रात “शहापाडा प्रादेशिक धरणातील पाणीसाठा अल्प असल्याने सात दिवस आड पाणी पुरवठा“ असा स्पष्ट दावा करण्यात आलेला आहे.
या पत्राद्वारे वडखळ, वाशी, शिर्की, खारेपाट व परिसरातील अनेक गावांवर गुंतागुंतीचे, रात्री-अपरात्री पाणी वाटपाचे वेळापत्रक लादण्यात आले आहे. वीज खंडित झाल्यास वेळ पुढे ढकलला जाईल आणि ग्रामस्थांनी सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. मात्र पाणी हा जीवनावश्यक हक्क असताना, सात दिवस आड पाणी पुरवठा लादण्याचा निर्णय संशयास्पद वाटतो.
जानेवारीपासूनच पाणीकपात
साधारणतः मार्च अखेर पर्यंत पुरणारा शहापाडा धरणाचा पाणीसाठा आज जानेवारी महिन्यातच संपत असल्याचा दावा केला जात आहे. पाण्याचा वापर अचानक वाढला का, गळती वाढली का, नियोजन चुकले का, की पाणी अन्यत्र वळवले गेले आहे, याचा सखोल आणि पारदर्शक खुलासा होणे अत्यावश्यक आहे. परिसराला दररोज व सुरळीत पाणीपुरवठा तात्काळ सुरू न केल्यास वाशी-शिर्की खारेपाट संबंधित ग्रामस्थ व नागरिक संघटना मार्फत एकत्रीत पणे, कायदेशीर मार्गाने तीव्र आंदोलन केल जाईल आसा इशारा देण्यात आला आहे.
हेटवणे धरणातून येणारी पाईप लाईनला पुरेसा पाणी मिळत नाही. आम्ही जिल्हा अधिकारी कार्यालयात पाणी टंचाई संदर्भात प्रस्ताव पाठविला आहे. तातडीने 10 दिवसात काम करून 3 दिवसाआड पाणी सुरु करण्यात येणार आहे.
सेफाली देशमुख, अधिकाी, ग्रामीण पाणी पुरवठा