नाते : किल्ले रायगड राष्ट्रीय महामार्गावरील पाचाड परिसरात आज (दि.२५) सकाळी झालेल्या भूस्खलनानंतर सात तास मलबा काढण्याचे काम सुरू होते. सकाळी आठनंतर सुरू झालेले मलबा काढण्याचे काम दुपारी सव्वा तीन वाजेपर्यंत म्हणजेच सात तास सुरूच होते. या ठिकाणी वारंवार भूस्खलन होत असल्याने अधिकाऱ्यांना परिस्थितीवर नियंत्रण ठेवताना मोठी कसरत करावी लागली.
किल्ले रायगड राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्याच्या रुंदीकरणादरम्यान या ठिकाणी माती काढण्यात आली होती, अशी माहिती स्थानिक ग्रामस्थांकडून देण्यात आली आहे. आज सकाळी आठनंतर या संदर्भात माहिती प्राप्त होतात या मार्गाचे काम करणाऱ्या संबंधित ठेकेदार, बांधकाम विभाग, स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
माती दूर करण्याची कामे सुरू केली. मात्र, गेल्या सात तासांत किमान तीन ते चार वेळा भूस्खलन झाल्याने कामात अडथळा येत होता. परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी कसरत करावी लागली. किल्ले रायगड महामार्गावरील अन्य ठिकाणी महामार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू असल्याची माहिती येथील स्थानिक शासकीय अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.
आज दिवसभर संपूर्ण तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू होता. महापुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. ग्रामीण भागात काही ठिकाणी घरांचे नुकसान झाल्याचे आपत्ती निवारण कक्षातून सांगण्यात आले.