

रायगड : रायगड जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाला पात्र महिला लाभार्थींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. जिल्हयात शासकीय यंत्रणांकडून प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असून, 22 जुलैपर्यंत 1 लाख 89 हजार 3 महिलांचे अर्ज प्राप्त झाले आहेत.
महाराष्ट्र शासनाने महिलांच्या सक्षमीकरणासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना सुरू केली आहे. या महत्त्वाकांक्षी योजनेचा उद्देश महिलांना आर्थिक स्वावलंबन देणे, त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करणे आणि त्यांच्या कुटुंबातील निर्णय प्रक्रियेत त्यांची भूमिका मजबूत करणे हा आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत पात्र महिलांना जुलै महिन्यापासून दरमाह 1500 रुपयांची आर्थिक मदत मिळेल. हे पैसे महिलांना त्यांच्या वैयक्तिक आणि घरगुती खर्च चालविण्यासाठी तसेच त्यांच्या आरोग्य आणि पोषणासाठी आणि कुटुंबाच्या निर्णयांमध्ये अधिक सक्रियतेने योगदान देण्यासाठी आर्थिक मदत ठरणार आहे. राज्य शासनाद्वारे ही योजना महिलांच्या उन्नतीसाठी सुरू करण्यात आली आहे, या उपक्रमाचा महाराष्ट्रातील अडीच कोटी महिलांना लाभ होण्याची अपेक्षा आहे. तर रायगड जिल्हयात सुमारे दहा लाख महिलांना लाभ होईल असे सांगितले जाते. आर्थिक सहाय्यावर लक्ष केंद्रित करून, सरकार महिलांच्या मूलभूत समस्यांचे निराकरण करण्याचा हा प्रयत्न आहे.
राज्य सरकारने महिलांच्या सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची घोषणा केल्यानंतर एकही पात्र महिला लाभापासून वंचित राहू नये यासाठी रायगड जिल्हा प्रशासनाने योग्य नियोजन केले आहे. या योजनेच्या प्रसिध्दीसाठी गावागावात बैठकांचे आयोजन करण्यात येत आहे. ग्रामसभेच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे.
योजनेच्या अनुषंगाने सर्व अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षिका यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. जिल्ह्यात विविध ठिकाणी अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. आवश्यक कागदपत्रांविषयी महिलांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. या सर्व प्रयत्नांना यश मिळाले असून, रायगड जिल्ह्यात दररोज पात्र महिला मोठ्या संख्येने योजनेचा लाभ मिळण्यासाठी अर्ज दाखल करीत आहेत.
या योजनेत नारीशक्ती या अॅपवरून सुरुवातीला ऑनलाइन अर्ज करावा लागत होता. मात्र, एकाचवेळी अनेकजण अर्ज करत असल्याने सर्व्हर संथगतीने चालत होते. त्यामुळे ऑफलाइन अर्जही स्वीकारण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. त्यामुळे कागदपत्रांसह लेखी अर्ज करून तो स्वीकारण्यात येत आहे. जिल्ह्यात 22 जुलैपर्यंत 1 लाख 23 हजार 815 महिलांनी ऑनलाईन तर 65 हजार 188 महिलांनी ऑफलाईन योजनेचा लाभ मिळावा यासाठी अर्ज केले आहेत. उर्वरित पात्र महिलांनी आपले अर्ज मुदतीत भरावेत असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आले आहे.या योजनेच्या माध्यमातून महिलांना आता आत्मनिर्भर बनण्याची संधी सरकार उपलब्ध करुन देणार आहे.