Cyber Fraud Pudhari
रायगड

Raigad Cyber Fraud | सायबर घोटाळ्याची व्याप्ती वाढणार!

रायगडमधील म्यूल अकाउंट हैदराबाद, बंगळुरूमधुन केली ऑपरेट

पुढारी वृत्तसेवा

रायगडः ऑनलाईन फसवणुकीतील सर्वात महत्त्वाचा दुवा असणाऱ्या 'म्यूल अकाउंट' (बोगस व भाड्याने घेतलेली बँक खाती) धारकांविरोधात रायगड जिल्हा पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे. मंगळवारी जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांत दाखल गुन्ह्यांची संख्या २३ वरून आज (बुधवार) ३४ वर पोहोचली आहे. त्यामुळे आधी ३५ कोटींचा असणारा हा सायबर घोटाळा आता सुमारे ४० कोटींच्या वर पोहोचला आहे. रायगड जिल्ह्यातील ही सर्व म्यूल खाती हैदराबाद, बंगळुरू आणि झारखंड येथून ऑपरेटर केली जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे, अशी माहिती रायगडच्या जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी 'दैनिक पुढारी'शी बोलताना दिली.

सध्या महाराष्ट्र पोलीस मुख्यालयाकडून राज्यभरात वेगवेगळ्या म्यूल अकाउंट धारकांविरोधात विशेष मोहीम राबवली जात आहे. जे खातेदार सायबर फसवणुकीच्या रकमेचा गैरफायदा घेतात, अथवा खात्यातील रक्कम फसवणुकीची आहे हे माहीत असूनही खाती उपलब्ध करून देतात, अशांवर ही कारवाई केली जात आहे.

या मोहिमेअंतर्गत रायगड पोलीस, रायगड सायबर क्राईम ब्रांच आणि जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनच्या माध्यमातून ही कारवाई करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या या गुन्ह्याच्या मुख्य सूत्रधाराकडे कसून तपास केला असता अत्यंत महत्त्वाची माहिती हाती लागली आहे. लवकरच या घोटाळ्याच्या मूळ 'कॉल सेंटर' पर्यंत पोहोचण्यात रायगड पोलिसांना यश येईल, असा विश्वास जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी व्यक्त केला.

दरमहा १० ते १५ हजारांची नोकरी करणारे, मजुरी करणारे आणि अशिक्षीत लोकांना या सायबर गुन्हेगारांनी जाळ्यात ओढले. शेअर मार्केटमधील भरघोस परतावा, पार्ट-टाईम नोकरीची आमिषे, डिजिटल अटक आणि एपीके-ओपीके फाईल्सचा वापर करून या भामट्यांनी निष्पाप नागरिकांना केवळ काही पैशांच्या आमिषाला बळी पाडले. त्यांच्या नावे रायगड जिल्ह्यातील विविध बँकांमध्ये खाती उघडण्यात आली.

पैसे कमावण्याच्या लालसेने किंवा कोणत्याही आमिषाला बळी पडून नागरिकांनी आपली बँक खाती, ओळखीची कागदपत्रे, फोटो अथवा सिमकार्ड अनोळखी व्यक्तींच्या हवाली करू नये, असे आवाहन रायगड पोलीस दलाने केले आहे. तसेच एखाद्या खात्याचा वापर सायबर गुन्ह्यात झाल्याचे आढळल्यास, खातेदारालाही थेट गुन्हेगार मानून त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा सज्जड इशारा पोलिसांनी दिला आहे.

सायबर घोटाळ्याची व्याप्ती वाढणार !

खाती उघडताच बँक केवायसी, चेकबुक, एटीएम कार्ड, पासवर्ड आणि बँक खात्याला जोडलेले मोबाईल सिमकार्ड सायबर गुन्हेगारांनी आपल्या ताब्यात घेतले व त्याद्वारे पुढील ऑनलाईन फसवणूकीचे गुन्हे केले असल्याचे तपासात समोर आले आहे. या तपासात सायबर क्राईम ब्रांचचे पोलीस उपनिरीक्षक अमोल जाधव आणि त्यांच्या टीमने अत्यंत उल्लेखनीय कामगिरी केली असून येत्या टप्प्यात आणखी गुन्हे दाखल होतील, असे दलाल यांनी सांगितले.

राष्ट्रीय सायबर गुन्हे रिपोर्टिंग पोर्टल आणि समन्वय पोर्टलवरील तक्रारींच्या सखोल विश्लेषणातून या बँक खात्यांमधील कोट्यवधींच्या संशयास्पद उलाढालीचा संशय आला होता. त्या अनुषंगाने तपास सुरू केला असता हा महाघोटाळा उघडकीस आला. मात्र, मूळ बँक खातेदारांना आपल्या नावावरील बँक खात्यातून असा कोट्यवधींचा घोटाळा चालला आहे, याची कल्पनाही नसल्याचे समोर आले आहे. पोलीस सध्या सर्व म्यूल खात्यांचे बँक स्टेटमेंट्स तपासत असून इतर राज्यांतील व जिल्ह्यांतील गुन्ह्यांशी असणारे यांचे कनेक्शन शोधले जात आहे. त्यामुळे व्याप्ती आणखी मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT