पनवेल : खारघर येथे दोन दिवसांच्या होणा-या रोलींग लाऊड कॉन्सर्ट या सांगितिक कार्यक्रमात चोरट्यांची चांदी झाली आहे. या कार्यक्रमाचे महागडी प्रवेशिका शुल्क असूनही हजारोंच्या संख्येने खारघरमध्ये तरूणवर्ग आला होता. मोठ्या आवाजातील सांगितिक कार्यक्रमात चोरट्यांनी शिरून साडेदहा लाख रुपयांचे सोने चोरी केल्याच्या तक्रारी खारघर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली.
खारघर उपनगरातील सेक्टर 31 येथे रोलिंग लाऊड इंडिया हिपहॉप म्युझिक फेस्टिव्हल साजरा झाला. पाच ते पन्नास हजार रुपये प्रवेशिका शुल्क असलेल्या या कार्यक्रमासाठी प्रेक्षकवर्ग सुद्धा त्याच उच्चभ्र घराण्यातील मुले व मुली होते. अखेरच्या क्षणात राज्य उत्पादन शुल्क विभागाची तात्पुरत्या स्वरूपात परवानगी मिळवून मद्यविक्रीचे स्टॉल येथे आयोजकांनी उभारले होते. हजारोंच्या संख्येने देशातील विविध शहरातून येथे तरूणवर्ग आला होता. कार्यक्रमातील कर्कश आवाज आणि तरूणांईचा जल्लोष यामध्ये चोरट्यांनी प्रेक्षकांच्या आभुषणावर डल्ला मारला.
खारघर पोलिसांकडे प्रेक्षकांनी दिलेल्या तक्रारीमध्ये रविवारी सायंकाळी 6 ते 10 वाजण्याच्या दरम्यान सोन्याचे दागीने चोरण्याचे प्रकार घडले. मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याने एकमेकांना खेटून असलेल्या प्रेक्षकांच्या गळ्यातून अक्षरशा सोनसाखळी खेचण्यात आल्या. अशा चार वेगवेगळ्या व्यक्तींच्या गळ्यातून 10 लाख 50 हजार रूपये किमतीच्या सोनसाखळ्या चोरीस गेल्या आहेत. खारघर पोलीस चोरट्यांचा शोध घेत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय कांबळे यांनी दिली.
विशेष म्हणजे ज्या मैदानावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने रोलिंग लाऊड कॉन्सर्टसाठी तात्पुरती मद्यविक्रीची परवानगी दिली. त्याच मैदानात अनेक अध्यात्मिक व धार्मिक कार्यक्रम यापूर्वी झाले आहेत.
स्थानिक नागरिकांचा या ठिकाणी मद्यविक्रीच्या स्टॉलच्या तात्पुरत्या स्वरूपातील परवान्याला सुद्धा विरोध होता. परंतू विना वाद हा फेस्टिव्हल साजरा होण्यासाठी अखेरच्या क्षणाला मद्यविक्रीची परवानगी देण्यात आली.
नागरिकांना ट्रॅफिकचा त्रास
या कार्यक्रमांत विझ खलिफा, डॉन टोलिव्हर (अमेरिका), सेंट्रल सी (यूके), तसेच करण औजला, दिव्य आणि हनुमानजाती (भारत) यांच्या सहभागाची घोषणा आयोजकांनी केली होती. या कार्यक्रमामुळे खारघरच्या स्थानिक रहिवाशांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागला. शनिवार व रविवार हे दोन दिवस सार्वजनिक सुट्टी असले तरी रात्रीच्यावेळी अभुतपूर्व कोंडी होती. वाहतूक पोलीस व खारघरचे स्थानिक पोलीस हीच कोंडीतून वाहतूक नियमनासाठी काम करताना दिसले. कार्यक्रमाची वेळ रात्री 10 पर्यंतची असली तरी कार्यक्रमाच्या सूरक्षेचा ताण मध्यरात्रीपर्यंत पोलिसांना सहन करावा लागला.