अलिबाग: विशेष सखोल पुनरावृत्ती अर्थात एसआयआर प्रक्रियेतून पात्र मतदारांची नावे मतदार यादीतून वगळली जात असल्याचा आरोप करत रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीने सोमवारी अलिबागेत जोरदार आंदोलन केले.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या भूमिकेची स्वतंत्र चौकशी करावी, दोष आढळल्यास कायद्यानुसार कारवाई करावी आणि त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, या मागणीसाठी काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला.
रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे (दक्षिण) जिल्हाध्यक्ष राजेंद्र ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. सकाळी ११ वाजता अलिबाग येथील बॅ. ए. आर. अंतुले भवन अर्थात काँग्रेस भवन, कर्वे रोड येथून मोर्चाला सुरुवात झाली. पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने सहभागी झाले. घोषणाबाजी करत मोर्चेकरी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने रवाना झाले.
एसआयआर प्रक्रियेच्या माध्यमातून मतदारांची नावे वगळली जात असल्याचा आरोप काँग्रेसने यावेळी केला. मतदार यादीतून पात्र नागरिकांची नावे चुकीच्या पद्धतीने वगळली जात आहेत का, याची स्वतंत्र चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आंदोलकांनी केली.
तसेच एसआयआर प्रक्रियेत वगळण्यात आलेल्या आणि नव्याने समाविष्ट झालेल्या मतदारांची अधिकृत आकडेवारी सार्वजनिक करावी, अशी मागणीही करण्यात आली. निवडणूक आयोगातील कथित अंतर्गत मतभेदांबाबत प्रसिद्ध झालेल्या वृत्ताचा दाखला काँग्रेसने दिला.
निवडणूक आयुक्त सुखबीर सिंह संधू आणि विवेक जोशी यांनी आयोगाच्या काही निर्णयांवर औपचारिक आक्षेप नोंदविल्याचा दावा या वृत्ताच्या आधारे करण्यात आला आहे.
या मोर्चाला रायगड जिल्हा काँग्रेसचे दक्षिण रायगडचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र ठाकूर, उत्तर रायगडचे जिल्हाध्यक्ष मनिष पाटील, नंदा म्हात्रे, ॲड. श्रद्धा ठाकूर, मिलिंद पाडगावकर, अशोक मोकल, समीर ठाकूर, श्रृती म्हात्रे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
‘आपलं मत, आपला अधिकार’
‘आपलं मत, आपला अधिकार’ आणि ‘भारतीय संविधानाचे रक्षण’ या घोषणांसह काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. भारतीय नागरिकांच्या मतदानाच्या अधिकारावर गदा आणून लोकशाहीचा संकोच केला जात असल्याचा आरोप यावेळी काँग्रेसकडून करण्यात आला.