Raigad Coconut Areca Nut Farming  pudhari photo
रायगड

Raigad Coconut Areca Nut Farming : रायगड जिल्ह्यातील नारळ-सुपारी बागांवर संकटाचे सावट

'शेंडा कुज' आणि 'गेंड्या भुंग्याचा' प्रादुर्भाव , बागायतदार चिंताग्रस्त

पुढारी वृत्तसेवा

रायगड : रायगड जिल्ह्याला लाभलेल्या अथांग किनारपट्टीमुळे येथे नारळ आणि सुपारीच्या बागांचे मोठे जाळे आहे. जिल्ह्यातील नारळ व सुपारी हे बागायतदारांच्या उदरनिर्वाहाचे आणि अर्थव्यवस्थेचे मुख्य साधन मानले जाते. मात्र, सध्या बदलत्या वातावरणामुळे बागांमध्ये 'शेंडा कुज रोग' (Bud Rot) आणि 'गेंड्या भुंगा' (Rhinoceros Beetle) यांसारख्या गंभीर आजार व कीटकांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली असून बागायतदार चिंतेत सापडले आहेत.

कृषी विभागाच्या उपलब्ध आकडेवारीनुसार रायगड जिल्ह्यात सुमारे ३,५०० ते ४,००० हेक्टर क्षेत्रावर नारळाची लागवड केली जाते. प्रतिहेक्टरी सर्वसाधारण १५० ते १७५ झाडे या हिशोबाने जिल्ह्यात सुमारे ५.५ ते ६ लाखांहून अधिक नारळाची झाडे आहेत. विशेषतः श्रीवर्धन, मुरुड, अलिबाग आणि किनारपट्टीला लागून असलेल्या भागात नारळाच्या बागा मोठ्या प्रमाणावर आहेत.

दुसरीकडे, जिल्ह्यात श्रीवर्धन, मुरुड, अलिबाग, रोहा आणि म्हसळा या तालुक्यांमध्ये मिळून सुमारे १,००० हेक्टर क्षेत्रावर (विशेषतः श्रीवर्धनी रोठा) सुपारीच्या बागा पसरलेल्या आहेत. यामध्ये सुमारे ४ लाखांहून अधिक सुपारीची झाडे समाविष्ट आहेत. श्रीवर्धन तालुक्यात २७८ हेक्टर, मुरुडमध्ये ४१६ हेक्टर तर अलिबागमध्ये २५६ हेक्टर क्षेत्र सुपारीच्या बागांनी व्यापलेले आहे. निसर्ग वादळांचे तडाखे आणि हवामानातील बदलांमुळे आधीच उत्पादनात घट झाली असताना, आता शेंडा कुजणे किंवा झावळ्या सुकून झाड नष्ट होण्याच्या समस्यांमुळे बागांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.

झाडावर शेंडा कुज रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास झाडाचा मध्यवर्ती कोंब किंवा शेंडा सडू लागतो, पाने पिवळी पडून सुकतात आणि संपूर्ण शेंडा गळून पडतो. दुसरीकडे, गेंड्या भुंग्याचा प्रादुर्भाव झाल्यास हा कीटक शेंड्याच्या मऊ भागात छिद्र पाडून रस शोषून घेतो. यामुळे बाहेर येणारी नवीन पाने 'व्ही' (V) आकाराची कापल्यासारखी दिसतात किंवा तुटतात, अशी माहिती चौल येथील नारळ बागायतदार विश्वास जोशी यांनी दिली.

शेंडा कुज रोगाचा प्रादुर्भाव दिसल्यास सर्वप्रथम झाडाच्या शेंड्यावरील कुजलेला व सडलेला भाग तातडीने स्वच्छ करून काढून टाकावा. त्यानंतर कॉपर ऑक्सिक्लोराईड ३ ते ४ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून शेंड्यावर टाकावे किंवा त्याची घट्ट पेस्ट बनवून बाधित भागावर लावावी. प्रादुर्भाव वाढू नये म्हणून १% बोर्डो मिश्रण (Bordeaux Mixture) किंवा मॅन्कोझेब (Mancozeb) ची संपूर्ण झाडावर फवारणी करावी. तसेच पावसामुळे किंवा पाण्यामुळे पुन्हा कुज लागू नये म्हणून स्वच्छ केलेल्या शेंड्यावर प्लास्टिक किंवा पॉलिथिन व्यवस्थित बांधून संरक्षण करावे, अशी उपाययोजना कृषी विभागाने सांगीतली आहे.

गेंड्या भुंग्याचा नायनाट करण्यासाठी झाडाच्या शेंड्यातील आणि पानांच्या बेचक्यांमधील भुंगे व साचलेला कचरा बांबूच्या सहाय्याने किंवा हाताने काढून घ्यावा. त्यानंतर झाडाच्या शेंड्यात बारीक वाळू आणि फोरेट किंवा कार्बोफ्युरॉन (Carbofuran) ग्रॅन्युल्स समप्रमाणात मिसळून टाकावेत. याव्यतिरिक्त वाळू आणि कडुनिंबाची पेंड (Neem cake) एकत्र करून शेंड्यात टाकल्यासही भुंग्याचा प्रादुर्भाव प्रभावीपणे कमी होतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT