अलिबाग :ओल्या मच्छीपेक्षा सुकी मच्छीची चवच न्यारी असते.कधीपण जेवणात ती लज्जत वाढविणारी असते.त्यात बोंबील,बांगडा,कोळंबी,सुकट,जवळा,मांदेली अशी कितीतरी नावे आपोआपच ओठावर येतात आणि खवय्यांची भूक चाळविते.या सुक्या म्हावऱ्याचा घमघमाटही खूप असतो.असाच घमघमाट सध्या रायगडच्या सर्वच समुद्रकिनारी दरवळत असून,मासळी सुकविण्याकडे कोळी महिला मग्न झाल्याचे दिसत आहे.
मासळीची मोठी बाजारपेठ म्हणून रायगड जिल्हा प्रसिद्ध आहे. यथील ओल्या मासळीबरोबरच सुकविलेल्या मासळीलाही मोठी बाजारपेठ आहे. सुकविलेल्या मासळीतून वर्षाला सुमारे 30 ते 35 कोटी रुपयांची उलाढाल होते. समुद्रात सध्या ओली मासळी मुबलक मिळत असल्याने, मासळी सुकविण्याकडे कोळी महिलांचा कल आहे.
अलिबाग, मुरड, उरण, श्रीवर्धन तालुक्यांमध्ये पहाटे मासळी सुकविण्यासाठी तर सायंकाळी मासळी जमा करण्यासाठी कोळी महिलांची लगबग सुरु असल्याचे दिसून येते. मासळी सुकविण्यासाठी बांबूची कनाथ तसेच ओटे करण्यात आले आहेत. तर काही ठीकाणी रस्त्यावर मासळी सुकविण्यात येत आहे.
मासळी सुकवण्याची प्रक्रिया प्रामुख्याने हवामानावर अवलंबून असते. खारे वारे जोरात वाहत असतात, तेव्हा मच्छी चांगल्या प्रमाणात सुकते. तसेच, त्यासाठी हवामान थंडही लागते. मासळी सुकविण्यासाठी समुद्रकिनारी बांबूच्या कनाथी उभारण्यात आल्या आहेत. त्यावर मोठ्या प्रमाणात सुकविण्यात येत आहे.
साडेचार हजार कुटुंबांचा उदरनिर्वाह
हजारो कुटुंबांचा चरितार्थ मासेमारी या व्यवसायावर अवलंबून आहे. जिल्ह्यात 4 हजार 993 छोट्या-मोठ्या नौकांच्या माध्यमातून मासेमारी करण्यात येते. सध्या मासेमारांच्या जाळ्यात बोंबिल, आंबाड, जवळा, कोळंबी, मांदेली, बांगडा, माकूल या प्रकरची मासळी मोठ्या प्रमाणात सापडत आहे. बाजारामध्ये विकूनही मासळी शिल्लक राहत आहे. तसेच बाजारात मासळी मुबलक असल्याने म्हणावी तशी किंमतही मिळत नसल्याचे चित्र आहे. यामुळे मासळी सुकविण्याकडे कोळी महिलांचा कळ असल्याचे दिसून येते.
मासळीला मोठी मागणी
सध्या ओळी मासळी मुबलक असल्याने दर कमी आहे. बाजारात जवळा व आंबाड, वाकटीला मागणी कमी असल्याने बाजारात ही मासळी विकण्याऐवजी सुकविण्याकडे कोळी महिलांचा कल आहे. तर माकल्या 100 ते 300 रुपये वाटा, मांदेली 100 रुपये वाटा, बांगडा 100 रुपयांना 5 ते 6 नगांचा वाटा, कोळंबी 200 ते 400 रुपये वाटा या दराने विक्री होत आहे. एप्रिल व मे महिन्यात सुक्या मासळीचे दर जास्त असतात, या महिन्यात सुकट प्रतिकिलो 350 ते 450 रुपये दराने विकली जात आहे.