रोहे : सेंट्रल रेल्वे कल्चरल अकादमीचे मार्गदर्शक, मध्य रेल्वे महाव्यवस्थापक श्री विवेक कुमार गुप्ता, यांनी 19 डिसेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील मध्य रेल्वेच्या सभागृहात आयोजित आंतर-विभागीय सांस्कृतिक स्पर्धा2025 मधील विजेत्यांना पुरस्कार वितरित केले.
मुंबई विभागाच्या सांस्कृतिक पथकाने विविध प्रकारांमध्ये 49 गुणांसह 9 पारितोषिके मिळवत सर्वोत्कृष्ट एकूण कामगिरीसाठी “सरताज” पुरस्कार पटकावला. मुख्यालयाच्या सांस्कृतिक पथकाने देखील 9 पारितोषिके मिळवत त्यांचा निकटचा संघर्ष केला. परळ वर्कशॉप आणि माटुंगा वर्कशॉपच्या सांस्कृतिक पथकांनी प्रत्येकी 3 पारितोषिके जिंकली.मुंबई विभागाच्या कलाकारांनी आपली कला सादर करत शास्त्रीय एकल नृत्य तसेच समूह नृत्य या दोन्ही प्रकारांमध्ये प्रथम पारितोषिक पटकावले.याशिवाय मुंबई विभागातील विविध कलाकारांनी संगीत, नृत्य, नाट्य तसेच रंगमंचामागील योगदानासाठीही पारितोषिके मिळवली.
मुख्यालयाच्या संघाने “विसर्जन” या सर्वोत्कृष्ट नाटकासाठी प्रथम पारितोषिक पटकावले. त्यानंतर मुंबई विभागाने मराठी नाटक “नाना नव्याणव बाद” तसेच हिंदी नाटक “आधे अधुरे” यांसाठी दोन द्वितीय पारितोषिके मिळवली. मुख्यालयाच्या पथकातील कलाकारांनी संगीत विभागात वर्चस्व राखत शास्त्रीय संगीत गायन, शास्त्रीय संगीत वादन तसेच सुगम संगीत वादन या प्रकारांमध्ये प्रथम पारितोषिके पटकावली. परळ वर्कशॉपच्या कलाकाराने सुगम संगीत गायन प्रकारात प्रथम पारितोषिक मिळवले.आयडीसीसी-2025 चे विजेते विविध ठिकाणी होणाऱ्या आंतर-रेल्वे सांस्कृतिक स्पर्धांमध्ये मध्य रेल्वेचे प्रतिनिधित्व करतील.मध्य रेल्वे आंतर-रेल्वे सांस्कृतिक स्पर्धा-नाट्य-2025 चे आयोजन करेल.
आंतर-विभागीय सांस्कृतिक स्पर्धा 2025 चे उद्घाटन दिनांक 17.12.2025 रोजी मध्य रेल्वे अतिरिक्त महाव्यवस्थापक श्री प्रतीक गोस्वामी, यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी सीआरसीए अध्यक्ष व प्रधान मुख्य वाणिज्य व्यवस्थापक श्री अरविंद मालखेडे सीआरसीए उपाध्यक्ष व मुख्य कार्मिक अधिकारी (आयआर ) श्री अनुराग मेश्राम आदी उपस्थित होते.पहिल्या दिवशी एकांकिका नाट्यस्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये विविध विभाग व वर्कशॉपमधील पथकांनी एकूण 11 नाटके सादर केली.
दुसऱ्या दिवशी उत्साहपूर्ण संगीत स्पर्धा पार पडल्या, ज्यामध्ये सहभागी कलाकारांनी विविध प्रकारांमध्ये आपले संगीत कौशल्य प्रभावीपणे सादर केले. तिसऱ्या व अंतिम दिवशी शास्त्रीय एकल नृत्य तसेच लोकनृत्य समूह सादरीकरणे सादर करण्यात आली, ज्यामुळे कार्यक्रमात रंगत व सांस्कृतिक विविधता आली. मध्य रेल्वेच्या विविध विभाग व वर्कशॉपमधील सुमारे 250 स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला, ज्यामुळे हा कार्यक्रम भव्य यशस्वी ठरला. या उपक्रमातून सीआरसीएच्या सांस्कृतिक उपक्रमांना प्रोत्साहन देण्याची व रेल्वे कर्मचाऱ्यांमधील कलागुणांना वाव देण्याची कटिबद्धता स्पष्टपणे दिसून आली. प्रधान विभागप्रमुख श्री हिरेश मीणा, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, मुंबई विभाग; मुख्यालय व विभागातील अधिकारी व कर्मचारी, तसेच इतर विभागांचे संघ व्यवस्थापक त्यांच्या संबंधित संघ सदस्य व कलाकारांसह या कार्यक्रमास उपस्थित होते.