

Mumbai CSMT Railway Employee Protest Central Railway
मुंबई : गुरुवारी संध्याकाळी कामावरून घरी परतणाऱ्या प्रवाशांचे ऐन गर्दीच्या वेळी हाल झाले. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे राष्ट्रीय रेल्वे मजदूर संघाने आंदोलन केले असून या आंदोलनात रेल्वे कर्मचारी सहभागी झाल्याने रेल्वे सेवा विस्कळीत झाली होती. संध्याकाळी सहा ते सात या कालावधीत सीएसएमटी स्थानकात प्रवाशांची गर्दी झाली होती.
संध्याकाळी सहाच्या सुमारास मजदूर संघाच्यावतीने आंदोलनाला सुरूवात झाली. तासभर हे आंदोलन सुरू होते. यामुळे संध्याकाळी सहा ते सात या कालावधीत रेल्वे सेवा विस्कळीत झाली. मध्य रेल्वेवरील वाहतूक ठप्प पडल्याने प्रवाशांचे हाल झाले. मध्य रेल्वेच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, लोहमार्ग पोलिसांनी दोन अभियंत्यांविरोधात गुन्हा दाखल केल्याने गुरुवारी रेल्वे कर्मचाऱ्यांनी सीएसएमटी स्थानकात आंदोलन केले. संध्याकाळी पावणे सात वाजता मध्य रेल्वेवरील वाहतूक पूर्ववत झाली आहे.
रेल्वे कर्मचाऱ्यांनी आंदोलन का केले?
मुंब्रा येथे 9 जून रोजी दुर्घटना घडली होती. यात पाच प्रवाशांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी चौकशी अहवालात रेल्वेच्या दोन अभियंत्यांवर ठपका ठेवण्यात आला होता. याविरोधात सेंट्रल रेल्वे मजदूर संघाने आंदोलनाचा इशारा दिला होता. यानुसार गुरुवारी संध्याकाळी मजदूर संघाच्यावतीने सीएसएमटी स्थानकावर आंदोलन करण्यात आले.