Butterflies in Raigad Pudhari
रायगड

Butterflies in Raigad: रायगडमध्ये फुलपाखरांची रंगीबेरंगी दुनिया! १४७ प्रजातींचा मुक्त संचार; दुर्मिळ फुलपाखरांचाही वावर

पश्चिम घाट आणि कांदळवनांमुळे फुलपाखरांना पोषक वातावरण; तणनाशके आणि प्रदूषणामुळे अधिवासाला धोका

पुढारी वृत्तसेवा

संतोष उतेकर

सुधागड : पश्चिम घाटाचा विस्तीर्ण पट्टा, मुबलक झाडेझुडपे, विस्तीर्ण निसर्गरम्य समुद्रकिनारा आणि कांदळवने या पोषक वातावरणामुळे रायगड जिल्ह्यात सध्या रंगीबेरंगी फुलपाखरांचा संचार वाढला आहे.

जिल्ह्यात १४७ प्रजातींचा मुक्त संचार पाहायला मिळत आहे. यात महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू 'ब्ल्यू मॉरमॉन' (राणी पाकोळी) आणि पश्चिम घाटातील सर्वात मोठे दुर्मिळ 'सदर्न बर्ड विंग' यांचाही समावेश आहे.

जिल्ह्यात फुलपाखरांना लागणारे 'होस्ट प्लांट्स' (फूड प्लांट्स) मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. नर-मादीच्या मिलनानंतर मादी कडूनिंब, कढीपत्ता, सीताफळ, रामफळ, लिंबू, कदंब व अशोक यांसारख्या झाडांवर अंडी घालते.

सोनटक्का व पानफुटीवर 'ग्रास डीमन' आणि 'रेड पियरो' ही सुंदर फुलपाखरे वाढतात. या रंगीबेरंगी दुनियेमुळे पर्यटक व स्थानिक नागरिक मोहीत होत असून, तिनविरा धरणाजवळ खास खासगी फुलपाखरू उद्यानही उभारण्यात आले आहे.

ग्रीन टच नर्सरीचे मालक अमित निंबाळकर म्हणाले की, परसबागेत फुलपाखरांना आकर्षित करण्यासाठी 'होस्ट प्लांट'ला नागरिकांकडून मोठी मागणी आहे.

तणनाशके आणि औद्योगिकीकरणाचा धोक्याचा इशारा मात्र, वाढता तणनाशकांचा वापर, झपाट्याने होणारे औद्योगिकीकरण आणि प्रदूषण यामुळे वनस्पती नष्ट होऊन फुलपाखरांच्या अळ्या व सुरवंटांचा अधिवास धोक्यात येत आहे, असा इशारा अभ्यासकांनी दिला आहे.

माणगाव येथील प्राणी-पक्षी व फुलपाखरू अभ्यासक शंतनू कुवेस्कर यांनी सांगितले की, जिल्ह्यात निसर्गसंपदा आणि सुरक्षित पर्यावरण आहे. घराच्या अंगणात पपई, पेरूसारखी फळे किंवा सडका बांगडा मासा ठेवूनही फुलपाखरांना आकर्षित करता येते जगात १७,५००, भारतात १५०० आणि महाराष्ट्रात ३४५ फुलपाखरांच्या जाती आहेत.

त्यातील १४७ प्रजाती एकट्या रायगडात आहेत. यात गुलाबी राणी, पितांबरी, सांजपरी, हळदीकुंकू, नील भिरभिरी, मयूर भिरभिरी व शुष्क पर्ण यांचा समावेश आहे.

वनक्षेत्रपाल समीर शिंदे म्हणाले की फुलपाखरे परागीकरणात मोठी मदत करतात. त्यामुळे जैवविविधता टिकवण्यासाठी त्यांच्या कांदळवनातील व जंगलातील अधिवासाचे संवर्धन करणे गरजेचे आहे.

शाळेत बटरफ्लाय गार्डन

नवीन पनवेल येथील आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालयात फेब्रुवारी महिन्यात बटरफ्लाय गार्डन उभारण्यात आले आहे. या उद्यानामुळे विद्यार्थ्यांना फुलपाखरांचे जीवनचक्र आणि त्यांचे पर्यावरणातील महत्त्व समजण्यास मदत होत आहे. या उपक्रमातून मुलांमध्ये लहान वयातच पर्यावरण आणि जैवविविधतेविषयी निस्सीम प्रेम निर्माण होईल. असे शिक्षक शशिकांत कुपटे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT