Raigad Bamboo Plantation Pudhari
रायगड

Raigad Bamboo Plantation: दरडग्रस्त रायगडला ‘बांबूचे संरक्षक कवच’; दरडींचा धोका कमी होणार

जिल्ह्यासाठी २० लाख रोपांद्वारे मृदसंधारणाचा आराखडा

पुढारी वृत्तसेवा

सुवर्णा दिवेकर

अलिबाग: रायगड जिल्ह्यात वाढत्या दरडी, मातीची धूप आणि भूजल पातळी घसरणीच्या समस्येवर उपाय म्हणून प्रशासनाने यंदा मोठ्या प्रमाणावर बांबू लागवडीचा आराखडा तयार केला आहे. येत्या पावसाळ्यात जिल्ह्यात तब्बल २० लाख बांबू रोपांची लागवड करण्यात येणार असून दरडग्रस्त आणि मातीची धूप होत असलेल्या भागांना प्राधान्य दिले जाणार आहे.

रायगडमध्ये गेल्या काही वर्षांत अतिवृष्टीमुळे डोंगर उतारांवरील माती वाहून जाण्याचे प्रमाण वाढले आहे.

अनेक गावांमध्ये दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर माती घट्ट धरून ठेवणारा आणि कमी कालावधीत वाढणारा बांबू हा प्रभावी पर्याय मानला जात आहे. त्यामुळे वनविभाग, सामाजिक वनीकरण विभाग आणि कृषी विभागाच्या माध्यमातून संयुक्तपणे मोठ्या प्रमाणावर बांबू लागवड मोहिम राबवली जात आहे.

खरीप हंगाम नियोजन बैठकीत फलोद्यान मंत्री भरत गोगावले यांनी बांबू लागवडीचा आढावा घेतला, जिल्ह्यासाठी बांबू लागवड लाभदायी ठरत असून कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना पडीक जागेत बांबू लागवडीसाठी प्रोत्साहित करण्याच्या सूचना केल्या.

सध्या जिल्ह्यातील विविध रोपवाटिकांमध्ये ४९ हजार २६९ बांबू रोपे तयार झाली असून उर्वरित रोपांची निर्मिती प्रक्रिया सुरू आहे. वनविभाग रोहा यांच्या ५, वनविभाग अलिबाग यांच्या १५, सामाजिक वनीकरण विभागाच्या १४ आणि कृषी विभागाच्या ७ अशा एकूण ४१ रोपवाटिकांमध्ये रोप निर्मितीचे काम सुरू आहे.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत वेश्वी येथील शासकीय रोपवाटिकेत बांबू रोप निर्मितीचा विशेष प्रयोग सुरू करण्यात आला आहे. या माध्यमातून महिला बचत गट, स्वयं सहायता गट आणि शेतकऱ्यांना रोजगारासोबत पर्यावरण संवर्धनाची संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जात आहे.

जमिनीची धुप होत असल्याने जमिनीतील पाणीपातळी, वाढता उष्मा यासह दरडी कोसळणे यासारख्या नैसर्गिक आपत्ती ओढावत आहेत. पारंपरिक भात शेतीवरील येथील शेतकऱ्यांचे लक्ष कमी झालेले असताना कृषी अधिकाऱ्यांनी शाश्वत बांबू लागवडीचे महत्व पटवून द्यावे.
- भरत गोगावले, मंत्री फलोत्‍पादन
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर सामूहिक वनहक्क पट्टे दिलेले असून रोपं तयार झाल्यावर ही रोपं प्रामुख्याने जिल्ह्यातील सामूहिक वनहक्क जमिनीवर लागवड करण्याचे नियोजन आहे. गडचिरोली जिल्ह्यातील मेंढालेखा हे गाव सीएफआरच्या अशा शाश्वत व्यवस्थापनातून समृद्ध झाल्याने या गावाचे उदाहरण आहे, तसेच प्रयत्न जिल्ह्यात केले जात आहेत.
- किशन जावळे, जिल्हाधिकारी, रायगड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT