Special Child National Olympiad
पनवेल : उत्तर प्रदेशातील गाझियाबाद-गाजीपूर येथे २ सप्टेंबर रोजी झालेल्या स्पेशल चाइल्ड राष्ट्रीय ऑलिंपियाड पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील विशेष खेळाडूंनी दमदार कामगिरी केली. महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पेण येथील हनुमान व्यायामशाळेच्या जितेश साजेकर याने ५३ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले. तर यश पांगत याला ७४ किलो वजनी गटात उत्तेजनार्थ ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.
जितेश साजेकर आणि यश पांगत हे पॉवरलिफ्टिंग स्पोर्ट्स असोसिएशन रायगडशी संलग्न हनुमान व्यायामशाळा, पेणचे खेळाडू आहेत. त्यांना व्यायामशाळेचे प्रशिक्षक व राष्ट्रीय खेळाडू राजेश अनगत यांचे प्रशिक्षण लाभले. तसेच शालेय प्रशिक्षक अमोल काईनकर (सुचित जीवन ट्रस्ट) यांचेही त्यांना मार्गदर्शन मिळाले.
रायगडच्या या विशेष खेळाडूंनी यापूर्वीही राष्ट्रीय स्तरावरील विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांच्या सातत्यपूर्ण यशाची दखल घेत जिल्हा पॉवरलिफ्टिंग संघटनेतर्फे यापूर्वी त्यांचा सत्कार करण्यात आला होता. आता पुन्हा राष्ट्रीय स्पर्धेत चमकदार कामगिरी करत जितेशने सुवर्णपदक पटकावल्याने रायगडच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण आहे.
खेळाडूंच्या या यशाबद्दल पॉवरलिफ्टिंग स्पोर्ट्स असोसिएशन रायगडचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य संघटनेचे उपाध्यक्ष गिरीश वेदक, सचिव अरुण पाटकर, सहसचिव सचिन भालेराव, सदस्य सुभाष टेंबे, संदीप कृष्णा पाटकर, ज्येष्ठ खेळाडू माधव पंडित, खजिनदार राहुल गजरमल आणि सहाय्यक रामचंद्र गावडे यांनी समाधान व्यक्त केले.
महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग असोसिएशन, मुंबईचे सचिव व शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त संजय सरदेसाई यांनीही दोन्ही खेळाडूंच्या कामगिरीचे कौतुक केले. जितेश साजेकर, यश पांगत तसेच त्यांच्या प्रशिक्षकांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील क्रीडा वाटचालीस सर्वांनी शुभेच्छा दिल्या.