APAAR ID Pudhari
रायगड

APAAR ID Raigad | रायगडमध्ये ८८ टक्के अपार आयडी पूर्ण; आधारअभावी सुमारे २६ हजार विद्यार्थी अडकले

रायगड जिल्ह्यात ५ लाख ५३ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत

पुढारी वृत्तसेवा

One Nation One Student ID Raigad

अलिबाग : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नोंदी डिजिटल स्वरूपात उपलब्ध करण्यासाठी राज्य सरकारने अपार आयडी अनिवार्य केला आहे. रायगड जिल्ह्यात या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत असून एकूण विद्यार्थ्यांपैकी ८८.२१ टक्के विद्यार्थ्यांचे अपार आयडी तयार झाले आहेत. ही टक्केवारी राज्याच्या ८६.७८ टक्के सरासरीच्या जवळपास आहे. मात्र, आधार कार्ड नसणे किंवा त्याचे प्रमाणीकरण न झाल्यामुळे सुमारे २५ हजार ७३० विद्यार्थ्यांचे अपार आयडी अद्याप प्रलंबित असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली.

राज्यातील सुमारे २ कोटी १५ लाख विद्यार्थ्यांपैकी रायगड जिल्ह्यात ५ लाख ५३ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. बहुतांश विद्यार्थ्यांकडे आधार उपलब्ध असला तरी काही विद्यार्थ्यांच्या आधार संदर्भातील त्रुटींमुळे आयडी तयार करण्यात अडथळे येत आहेत.

गडचिरोली, सातारा, अहिल्यानगर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत अपार आयडी पूर्णतेची टक्केवारी ९० पेक्षा अधिक आहे. गोंदिया, वर्धा, भंडारा आणि परभणी येथेही प्रक्रिया वेगाने सुरू आहे. रायगडने समाधानकारक प्रगती केली असली तरी स्थलांतरित कुटुंबांची संख्या मोठी असल्याने मोहिमेच्या अंमलबजावणीत काही अडचणी येत आहेत.

अपार मोहिमेतील अडथळे

अनेक विद्यार्थ्यांच्या आधार कार्डवरील नाव आणि शाळेतील नोंदीतील नावात तफावत आढळत आहे. काही ठिकाणी आडनाव नसणे, इंग्रजी स्पेलिंगमध्ये चुका, पालकांच्या नावातील दुरुस्तीची आवश्यकता किंवा जन्मतारखेत फरक असल्याने आधारचे प्रमाणीकरण होत नाही. काही विद्यार्थ्यांकडे जन्म दाखला उपलब्ध नसल्यामुळे, विशेषतः परप्रांतीय विद्यार्थ्यांना मूळ गावी जाऊन नव्याने दाखला काढावा लागत आहे, ज्यामुळे प्रक्रिया विलंबित होते.

पालकांच्या निरक्षरतेमुळे अडथळे

आधार दुरुस्ती आणि नव्याने नोंदणीसाठी महसूल विभागाकडून विशेष मोहीम राबवली जात आहे. मात्र पालकांमधील निरक्षरता, रोजंदारीची कामे, वेळेचा अभाव तसेच अपार आयडीचे महत्त्व पुरेसे न समजणे यामुळे प्रतिसादात दिरंगाई होत आहे. शिक्षकांच्या माध्यमातून पालकांना जनजागृती करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

उच्च शिक्षणासाठी अपार आयडी आवश्यक

गेल्या दोन वर्षांपासून राज्य सरकारने अपार आयडी सक्तीचा केला आहे. या आयडीद्वारे विद्यार्थ्यांची गुणपत्रिका, प्रवेश प्रक्रिया आणि शैक्षणिक प्रगतीची माहिती डिजिटल स्वरूपात उपलब्ध होणार आहे. उच्च शिक्षणासाठी अपार आयडी अनिवार्य ठरणार असल्याने उर्वरित विद्यार्थ्यांचे आयडी लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आव्हान शिक्षण विभागासमोर आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT