Roha Ambewadi Hunger Strike
कोलाड : मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरील आंबेवाडी (कोलाड–वरसगाव) येथील VUP उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूंना २०० मीटर अंतरावर अंडरपास बोगदे देण्यात यावेत, अर्धवट असलेले सर्व्हिस रोडचे काम तातडीने पूर्ण करावे, गटारांवर झाकणे बसवावे, तसेच सदर अंडरपास पेण, नागोठणे, लोणेरे व महाड येथील अंडरपासप्रमाणे करण्यात यावेत, या प्रमुख मागण्यांसाठी आंबेवाडी बाजारपेठेत आंबेवाडी–कोलाड–वरसगाव पंचक्रोशीतील जागरूक नागरिकांनी सोमवार (दि. ५) पासून साखळी उपोषणास सुरुवात केली होती. मागण्या पूर्ण होईपर्यंत उपोषण सुरूच राहणार असल्याचा निर्धार यावेळी नागरिकांनी व्यक्त केला होता.
सदर साखळी उपोषण सलग सहा दिवस सुरू होते. शनिवारी (दि. १०) सकाळी ११ वाजता राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी धीरज शहा, रोहा तहसीलदार किशोर देशमुख तसेच कोलाडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन मोहिते यांनी उपोषणकर्त्या नागरिकांशी चर्चा केली.
यानंतर रोहा तहसीलदार किशोर देशमुख यांनी फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा प्रशासन व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या संबंधित अधिकाऱ्यांसमवेत बैठक आयोजित करून योग्य निर्णय घेण्यात येईल, तोपर्यंत उपोषणास स्थगिती द्यावी, असे लेखी निवेदनाद्वारे नागरिकांना आश्वासन दिले.
यावेळी आंबेवाडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सुरेशशेठ महाबळे, चंद्रकांत लोखंडे, गणेश शिंदे, महेंद्र वाचकवडे, संजय कुर्ले, चंद्रकांत जाधव, समीर महाबळे, बबलू सय्यद, संजय लोटणकर, विजय बोरकर, मंगेश सरफळे, असिफशेठ सय्यद, उदय खामकर, दगडू हाटकर यांच्यासह असंख्य व्यापारी व कोलाड परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यानंतर शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख अरुण चालके यांच्या हस्ते उपोषणकर्त्यांना सरबत देऊन साखळी उपोषणाला स्थगिती देण्यात आली. मात्र, मंत्रालयात दि. १६ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या बैठकीत मार्ग निघाला नाही व मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर पुन्हा साखळी उपोषणास सुरुवात करून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा उपोषणकर्त्या नागरिकांनी दिला आहे.