Amba River Flood Raigad
महेंद्र माने
नागोठणे : सततच्या मुसळधार पावसामुळे अंबा नदीने पुन्हा एकदा धोक्याची पातळी ओलांडल्याने नागोठणे शहराला दुसऱ्यांदा पुराचा फटका बसला आहे. एसटी स्थानक, छत्रपती शिवाजी महाराज बाजारपेठ, दोन्ही कोळीवाडे, मोहल्ला परिसर तसेच शहरातील अनेक सखल भाग पाण्याखाली गेल्याने घरांमध्ये व दुकानांमध्ये पाणी शिरून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.
शनिवार (४ जुलै) मध्यरात्री अंबा नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली. रविवारी पहाटेपासून पुराचे पाणी शहरात शिरू लागले. एसटी स्थानक, मरिआई मंदिर परिसर, मटण मार्केटमागील भाग, हॉटेल लेकव्ह्यू, सरकारी विश्रामगृहासमोरील रस्ता तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसर जलमय झाला. बाजारपेठ, कोळीवाडा आणि मोहल्ल्यातील अनेक घरांमध्ये व दुकानांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांना रात्रभर जागून परिस्थितीचा सामना करावा लागला.
पूरामुळे नागोठणे शहराकडे येणारे तिन्ही प्रमुख मार्ग बंद झाले. एसटी स्थानकही पाण्याखाली गेल्याने एसटी वाहतूक महामार्गावरून वळविण्यात आली. प्राथमिक आरोग्य केंद्र येथे तात्पुरता बसथांबा सुरू करण्यात आला. मात्र प्रवाशांना पावसात पर्यायी मार्गाने पायी प्रवास करावा लागल्याने मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
मंगळवारी सकाळी पुराचे पाणी ओसरल्यानंतर नागरिक व व्यापाऱ्यांनी घरे आणि दुकाने स्वच्छ करण्यास सुरुवात केली. भिजलेले साहित्य बाहेर काढून साफसफाई सुरू असतानाच बुधवारी पहाटे पुन्हा पाणी शिरल्याने त्यांची चिंता अधिक वाढली. दुपारपर्यंत पाणी कमी होऊ लागले असले तरी पुन्हा मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
पूराच्या तडाख्यामुळे नागोठणे शहर व परिसरात सलग चार दिवस वीजपुरवठा खंडित होता. त्यामुळे मोबाईल चार्जिंग, नेटवर्क आणि दूरध्वनी सेवा ठप्प झाल्याने नागरिकांचा बाहेरील जगाशी संपर्क तुटला. यामुळे नातेवाईक आणि मित्रपरिवारामध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झाले.
अंबा नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहून आवश्यक असल्यास सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे, घरातील महत्त्वाच्या वस्तू सुरक्षित ठिकाणी ठेवाव्यात तसेच पूरानंतर कुजलेले अन्नधान्य व इतर कचरा घंटागाडीतच टाकून साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सहकार्य करावे,सुप्रिया महाडीक, सरपंच नागोठणे ग्रामपंचायत