Alibag Khandale NQAS Certification
अलिबाग: राष्ट्रीय गुणवत्ता हमी मानकांतर्गत अलिबाग तालुक्यातील खंडाळे आयुष्यमान आरोग्य केंद्राने राष्ट्रीय स्तरावर प्रमाणपत्र प्राप्त केले आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात सर्वाधिक 92 गुण प्राप्त झालेले खंडाळा हे पहिलेच आयुष्यमान आरोग्य केंद्र ठरले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या सातत्यपूर्ण सेवेचा हा गौरव झाला आहे. राष्ट्रीय पथकाने खंडाळा येथे मार्चमध्ये आरोग्य केंद्रांची पाहणी केली होती. यानंतर 22 मे रोजी निकाल जाहीर करण्यात आला.
राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानके (एनएक्यू) हा भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयांतर्गत राबविण्यात येणारा महत्त्वाचा गुणवत्ता कार्यक्रम आहे. शासकीय आरोग्य संस्थांमधील सेवेची गुणवत्ता, औषध व साधनसामग्री व्यवस्थापन, रुग्ण तपासणी व त्यांचे समाधान, स्वच्छता आदी गोष्टींचे सखोल मूल्यमापन करण्यात येते. या अंतर्गत खंडाळे आयुष्यमान केंद्राला प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे. हे यश केवळ गुणांचे नसून दर्जेदार, रुग्णकेंद्रित, सुरक्षित व शिस्तबद्ध आरोग्य सेवा देण्यासाठी केलेल्या सातत्यपूर्ण आणि सामुहिक प्रयत्नांचे फलित आहे.
या उल्लेखनीय यशासाठी आयुष्यमान आरोग्य केंद्र खंडाळेच्या समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. स्मिता म्हात्रे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी सपकाळ, प्राथमिक आरोग्य केंद्र पोयनाडचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पद्मश्री आंधळकर, आरोग्य सेविका मनस्वी वाईरकर, आरोग्य सेवक रवींद्र पगारे व आशा कार्यकर्ता नेत्रा घरत, स्मिता थळे, नीता घरत, राखी घाटकर, सीमा भगत, श्वेता पाटील, दिपाली मोरे यांनी मेहनत घेतली. तसेच खंडाळा ग्रामपंचायतीचे सरपंच नासिकेत कावजी, वाडगावचे सरपंच जयेंद्र भगत यांचे सहकार्य लाभले.
सदर पुरस्कार मिळण्यासाठी मार्गदर्शक म्हणून रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर, उपाध्यक्ष तथा आरोग्य सभापती मधुकर पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. मनिषा सातपुते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्राची नेहूलकर, डॉ. सुप्रिया वेटकोळी, जिल्हा सार्वजनिक आरोग्य परिचर्या उषा वावरे, एनक्यूएएस सहाय्यक चित्रा गुरव, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी रेश्मा संकपाळ यांचेही सहकार्य लाभले.