Raigad Rain Alert (Pudhari File Photo)
रायगड

Raigad Rain Alert: रायगड जिल्ह्यात 21 एप्रिलला वादळी पावसाचा इशारा; आंबा, काजू बागायतदारांना तातडीच्या काढणीचे आवाहन

विद्यापीठाकडून पाच दिवसांचा कृषी हवामान अंदाज जाहीर

पुढारी वृत्तसेवा

रायगड: डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ आणि भारत मौसम विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने रायगड जिल्ह्यासाठी आगामी पाच दिवसांचा कृषी हवामान अंदाज जाहीर करण्यात आला आहे.

21 एप्रिल रोजी जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह वादळ, हलका ते मध्यम पाऊस आणि ताशी 30-40 किमी वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी आणि बागायतदारांनी पिकांची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हवामान अंदाज आणि तापमान

मुंबई प्रादेशिक हवामान केंद्र यांच्या अंदाजानुसार, 17 आणि 18 एप्रिल रोजी हवामान कोरडे राहील. मात्र, 19 एप्रिलपासून ढगाळ हवामान होऊन हलका पाऊस सुरू होण्याची शक्यता आहे. 20 आणि 21 एप्रिल रोजी पावसाचा जोर वाढून तो मध्यम स्वरूपाचा असू शकतो. या काळात कमाल तापमान 32-33 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 24-25 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील.

बागायतदारांसाठी महत्त्वाच्या सूचना

आंबा काढणी: पावसाचा अंदाज लक्षात घेता, काढणीस तयार असलेल्या हापूस आंब्याची नूतन झेल्याच्या साहाय्याने तातडीने काढणी करावी. फळांमधील साका कमी करण्यासाठी काढणी सकाळी 10 वाजेपूर्वी किंवा संध्याकाळी 4 नंतरच करावी. काढलेली फळे सुरक्षित व झाकलेल्या ठिकाणी ठेवावीत.

काजू संरक्षण: पक्व काजू बियांची वेचणी करून त्या पावसामुळे ओल्या होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. वाळवण्यासाठी ठेवलेल्या काजू बिया सुरक्षित ठिकाणी हलवाव्यात.

वणवा प्रतिबंध: वाढत्या उष्णतेमुळे जंगलात वणवा लागण्याची शक्यता असते. बागांचे संरक्षण करण्यासाठी बागेभोवती वणवा निरोधक पट्टे साफ करावेत.

शेती आणि भाजीपाला

उन्हाळी भात सध्या दाणे भरणे अवस्थेत आहे. त्यामुळे खाचरात पाण्याची पातळी 5 सें.मी. पर्यंत नियंत्रित ठेवावी.ज्या शेतकऱ्यांच्या भुईमुगाच्या शेंगा तयार झाल्या आहेत, त्यांनी पावसापूर्वी काढणी पूर्ण करून शेंगा सुरक्षित स्थळी साठवाव्यात.मिरची, वांगी, टोमॅटो आणि भेंडीची काढणी तातडीने उरकून घ्यावी. रसशोषक किडींच्या नियंत्रणासाठी पिवळ्या चिकट सापळ्यांचा वापर करावा.

पशुधन आणि कुक्कुटपालन

वादळी वाऱ्याच्या शक्यतेमुळे जनावरांना सुरक्षितपणे गोठ्यात बांधावे. कुक्कुटपालन शेडच्या खिडक्या झाकून पक्षांचे पावसापासून संरक्षण करावे.जनावरांना पिण्यासाठी स्वच्छ व थंड पाणी द्यावे. उष्माघाताचा ताण टाळण्यासाठी पाण्यात 1 टक्के गूळ आणि 0.5टक्के मीठ मिसळून ते चाऱ्यावर शिंपडावे.

हळद लागवडीची तयारी

हळदीची लागवड एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू करणे फायदेशीर ठरते. त्यासाठी जमिनीची 18 ते 22 सें.मी. खोल नांगरणी करून जमीन 15-20 दिवस उन्हात तापू द्यावी आणि प्रति एकर 25 ते 40 टन कुजलेले शेणखत मिसळून जमीन तयार ठेवावी, असा सल्ला कृषी तज्ज्ञांनी दिला आहे.शेतकऱ्यांनी अधिक माहितीसाठी कृषी विज्ञान केंद्र किंवा तालुका कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन नोडल अधिकारी डॉ. वैभव राजेमहाडीक यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT