Managaon Theatre: माणगावमधील नाट्यरसिकांच्या आशेवर निराशेचे पाणी; सांस्कृतिक चळवळ उभारणीला खीळ

निधीअभावी रखडले माणगावचे स्वप्नवत नाट्यगृह
Managaon Theatre
Managaon TheatrePudhari
Published on
Updated on

कमलाकर होवाळ

माणगाव: माणगाव शहराच्या सांस्कृतिक ओळखीला नवी उंची देणारे, बहुप्रतिक्षित नाट्यगृह आजही निधीअभावी अर्धवट अवस्थेत उभे असल्याचे वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे. तब्बल आठ वर्षांपासून हे बांधकाम रखडल्याने स्थानिक नाट्यरसिक, कलाकार आणि सांस्कृतिक क्षेत्राशी निगडित नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सन 2018 मध्ये मोठ्या उत्साहात या नाट्यगृहाचे भूमिपूजन करण्यात आले होते. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत या प्रकल्पाचा शुभारंभ झाला होता. सुरुवातीच्या टप्प्यात निधी उपलब्ध झाल्याने कामाला गती मिळाली होती.

Managaon Theatre
Neral Dowry Harassment Case: हुंड्यासाठी विवाहितेचा छळ! बंदुकीचा धाक, पतीने ठेवले डांबून...

मात्र मंजूर निधी अपुरा पडल्याने पुढील टप्प्यात काम ठप्प झाले आणि “लवकरच निधी मिळेल” या आशेवर सुरू असलेले काम अखेर थांबवावे लागले. दरम्यान, गेल्या काही वर्षांत बांधकाम साहित्याच्या दरात मोठी वाढ झाल्याने या प्रकल्पाचा खर्चही वाढला आहे. त्यामुळे आता नाट्यगृह पूर्णत्वास नेण्यासाठी वाढीव निधीची गरज भासत आहे.

निधीअभावी अर्धवट राहिलेले बांधकाम सध्या माणगावच्या सांस्कृतिक दुर्लक्षाचे प्रतीक ठरत आहे. सदर नाट्यगृह जुने माणगाव येथील शासकीय विश्रामगृहा समोरील सुमारे दोन एकर जागेवर उभारले जात आहे.

सुमारे 700 प्रेक्षकांची आसन क्षमता, अत्याधुनिक ध्वनी व प्रकाश व्यवस्था, कलाकारांसाठी स्वतंत्र सुविधा तसेच प्रशस्त वाहनतळ अशा सर्व सोयींनी सुसज्ज असे हे नाट्यगृह प्रस्तावित आहे. हे काम पूर्ण झाले असते, तर माणगावच्या सांस्कृतिक वैभवात मोठी भर पडली असती, असा विश्वास नागरिक व्यक्त करत आहेत.

Managaon Theatre
ATV Illegal Tourism: अलिबाग किनाऱ्यावर बेकायदेशीर एटीव्ही गाड्या सुरूच

माणगावमध्ये स्वतंत्र नाट्यगृह उभारण्याचे स्वप्न स्वर्गीय माजी आमदार अशोकदादा साबळे यांनी पाहिले होते. त्यांच्या प्रयत्नातून या प्रकल्पाला मंजुरी मिळाली. मात्र निधीअभावी हे स्वप्न अद्याप साकार होऊ शकलेले नाही, ही खंत स्थानिकांमध्ये व्यक्त होत आहे.

दरम्यान, खासदार सुनील तटकरे यांनी या प्रकल्पाबाबत सकारात्मक भूमिका घेत, “नाट्यगृहासाठी आवश्यक निधी लवकरच उपलब्ध करून दिला जाईल,‌’ अशी ग्वाही दिली आहे. तरीही प्रत्यक्षात निधी कधी मंजूर होणार आणि बांधकाम कधी पूर्णत्वास जाणार, याकडे संपूर्ण माणगावकरांचे लक्ष लागून राहिले आहे.

माणगावला सांस्कृतिक शहर म्हणून ओळख निर्माण करण्याची संधी या नाट्यगृहाच्या माध्यमातून मिळू शकते. मात्र निधी अभावी हे स्वप्न रखडू नये आणि लवकरात लवकर हे नाट्यगृह पूर्ण व्हावे, हीच अपेक्षा आज प्रत्येक नाट्यप्रेमी व्यक्त करत आहे.

एक कोटी रुपयांच्या निधीची मागणी

माणगाव नगरपंचायतीच्या हद्दीत विविध विकास कामांच्या भूमिपूजन कार्यक्रमावेळी आयोजित जाहीर सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते ॲड. राजीव साबळे यांनी प्रलंबित नाट्यगृहासाठी किमान एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्याची मागणी केली.

नाट्यगृहाचे काम निधीअभावी रखडले असल्याने तातडीने आर्थिक मदत आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. यावर खासदार सुनील तटकरे यांनी सकारात्मक भूमिका घेत, नाट्यगृहाच्या कामासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे स्पष्ट आश्वासन दिले. त्यामुळे या प्रकल्पाला लवकरच गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news