Electricity Pudhari
रायगड

Raigad Hydroelectric Power History: विज निर्मितीत रायगड जिल्ह्याची १११ वर्षांची यशस्वी वाटचाल

कर्जतमधील प्रस्तावित टोरंट प्रकल्पावर चर्चा सुरू असताना सह्याद्रीच्या कुशीत उभारलेल्या टाटा समूहाच्या ऐतिहासिक वीज प्रकल्पांचा वारसा पुन्हा चर्चेत

पुढारी वृत्तसेवा

जयंत धुळप

रायगड: रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यांत प्रस्तावित असलेल्या टोरंट जलविद्युत प्रकल्पावरून सध्या राज्यात मोठा गदारोळ सुरू आहे. मात्र, वीज निर्मितीच्या क्षेत्रात रायगड जिल्ह्याला १११ वर्षांचा गौरवशाली इतिहास लाभला आहे.

मुंबई आणि पुण्यासारख्या महानगरांच्या औद्योगिक प्रगतीचा पाया रायगडमधील सह्याद्रीच्या कुशीत उभारलेल्या वीज प्रकल्पांनी घातला आहे.

टाटा समूहाची दूरदृष्टी आणि जलविद्युत प्रकल्पांची मुहूर्तमेढ

मुंबईपासून अवघ्या ११२ कि.मी. अंतरावरील सह्याद्रीच्या रांगांमध्ये पडणाऱ्या मुसळधार पावसाच्या पाण्यापासून वीज निर्मिती करण्याचे स्वप्न सर्वप्रथम जमशेटजी टाटा यांनी पाहिले. ब्रिटिश अभियंता डेव्हिड गॉसलिग यांनी या योजनेचा आराखडा तयार केला होता. जमशेटजींच्या निधनानंतर त्यांचे सुपुत्र सर दोराबजी आणि सर रतन टाटा यांनी हे स्वप्न प्रत्यक्षात आणले.

या अंतर्गत १९०७ मध्ये परवाना मिळाल्यानंतर १९१० मध्ये 'टाटा हायड्रो-इलेक्ट्रिक पॉवर सप्लाय कंपनी' स्थापन झाली आणि वळवण व शिरवट येथे धरण बांधून १९१५ मध्ये खोपोलीत ४०,००० कि. वॅट क्षमतेने प्रत्यक्ष वीज निर्मिती सुरू झाली.

मुंबई-पुणे परिसरातील १६०९ चौ. किमी परिसराला वीज पुरवठा

पुढे पहिल्या महायुद्धातील औद्योगिक गरज लक्षात घेऊन १९१६ मध्ये 'आंध्र व्हॅली पॉवर सप्लाय कंपनी' स्थापन झाली आणि ठोकरवाडी धरणाच्या पाण्यावर १९२२ मध्ये भिवपुरी केंद्रातून ४८,००० कि. वॅट वीज निर्मिती सुरू झाली.

त्यानंतर मुंबईची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी मुळशीजवळ धरण बांधून १९२७ मध्ये तत्कालिन कुलाब्यातील (रायगड) भिरा येथे ८७,५०० कि. वॅट क्षमतेचा प्रकल्प कार्यान्वित झाला. या तिन्ही प्रकल्पांमुळे मुंबई-पुणे परिसरातील १,००० चौ. मैल म्हणजेच १६०९ किमी परिसराला स्वस्त वीज मिळू लागली. ही यंत्रणा तत्कालीन दक्षिण-पूर्व आशियातील सर्वात मोठी प्रणाली ठरली, जिची एकत्रित क्षमता १९७८ पर्यंत २८५ मेगावॅटवर पोहोचली.

स्थानिक केंद्रे आणि उरण गॅस टर्बाइन प्रकल्प

जलविद्युत प्रकल्पांव्यतिरिक्त १९३१ ते १९३४ या काळात माथेरान, महाड आणि मुरुड-जंजिरा येथे डिझेलवर चालणारी वीज केंद्रे, तर पनवेलमध्ये स्थानिक वितरण कंपनी सुरू झाली. स्वातंत्र्यानंतर १९५४ ते १९८५ दरम्यान महाराष्ट्र राज्य वीज मंडळाने ही सर्व केंद्रे आपल्या ताब्यात घेतली.

पुढे राज्याची वीज टंचाई दूर करण्यासाठी बॉम्बे हायमधील नैसर्गिक वायूवर आधारित उरण गॅस टर्बाइन प्रकल्प उभारण्यात आला. ३ मार्च १९८२ रोजी सुरू झालेल्या या प्रकल्पाची क्षमता १९८८ पर्यंत ६७२ मेगावॅट झाली, तर १९९१ मध्ये वाया जाणाऱ्या उष्णतेपासून अतिरिक्त वीज मिळवण्यासाठी 'वेस्ट हीट रिकव्हरी' प्रकल्पाची पायाभरणी झाली.

ग्रामीण विद्युतीकरण आणि औद्योगिक भरारी

महाराष्ट्र राज्य वीज मंडळाने उभारलेल्या भक्कम जाळ्यामुळे जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलला. १९६०-६१ मध्ये केवळ १० शहरे आणि १६ गावांपुरती मर्यादित असलेली वीज १९८७ अखेर रायगड जिल्ह्यातील १,८०० गावांपर्यंत पोहोचली. खोपोली, रोहा, पनवेल, तळोजा, रसायनी, पाताळगंगा, नागोठणे, महाड येथील एमआयडीसी आणि थळ-वायशेत आरसीएफ खत कारखान्यामुळे जिल्ह्यात मोठी औद्योगिक क्रांती घडली.

याचा परिणाम म्हणून १९५०-५१ मध्ये अवघा ६,७९,००० कि. वॅट असलेला जिल्ह्याचा वीज वापर १९८९-९० मध्ये १६८ कोटी ४३ लाख ९३ हजार कि. वॅटपर्यंत पोहोचला; ज्यामध्ये तब्बल ९०.३७ टक्के वाटा एकट्या औद्योगिक क्षेत्राचा होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT