Rahul Narwekar 
रायगड

Rahul Narwekar Viral Video: म्हात्रोळीत जमीन मोजणीवरून वाद; विधानसभा अध्यक्ष नार्वेकर आणि शेतकरी आमनेसामने

व्हायरल व्हिडिओमुळे राजकीय वातावरण तापले; संजय राऊतांचे सवाल, नार्वेकरांचे स्पष्टीकरण

पुढारी वृत्तसेवा

रायगड : विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि स्थानिक शेतकरी यांच्यात अलिबाग तालुक्यातील म्हात्रोळी गावामध्ये बाचाबाची झाल्याचा व्हिडीओ शनिवारी सकाळी व्हायरल झाल्यावर येथे खळबळ उडाली व राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. या व्हिडीओमध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि स्थानिक शेतकरी यांच्यात बाचाबाची झाल्याचे दिसत आहे. शेतकऱ्यांनी नार्वेकर यांना तिथून जाण्यास भाग पाडल्याचा दावा म्हात्रोळी गावातील ग्रामस्थांनी केला आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी घडली असल्याचे या ग्रामस्थांनी सांगितले.

म्हात्रोळीमधील ग्रामस्थांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे काही शासकीय कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन जागेची मोजणी करण्यासाठी गेले होते. रमेश पाटील या शेतकऱ्याच्या मालकीच्या शेतात ही मोजणी सुरू होती. त्यांच्या कुटुंबात लग्न असल्याने ते अन्यत्र होते. त्यांना याबाबत माहिती मिळताच रमेश पाटील कुटुंबीयांसह शेतावर आले. त्यांनी जमीन मोजणीस तीव्र विरोध दर्शवून नार्वेकर व सोबत असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना निघून जाण्यास सांगितले. तरीही त्यांनी तिथे थांबण्याचा प्रयत्न केला. संतप्त झालेल्या रमेश पाटील कुटुंबीयांनी त्यांना तिथून अक्षरशः पळवून लावल्याचा दावा प्रत्यक्षदर्शी ग्रामस्थांनी केला आहे. नार्वेकर यांनी रमेश पाटील यांना समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु ते ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत नव्हते. अखेर नार्वेकरांनी कर्मचाऱ्यांसह काढता पाय घेतला.

संजय राऊत यांनी व्हिडीओ शेअर करून उपस्थित केले प्रश्न शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी हा व्हिडीओ आपल्या एक्स सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला. खासदार राऊत यांनी आपल्या पोस्टमध्ये प्रश्न विचारले की, विधानसभा अध्यक्षांसोबत ही हाणामारी कुठे आणि का झाली? राहुल नार्वेकर यांनी तिथून पळ काढला आहे, हे तुम्ही सांगताय की मी सांगू? अशी टीका त्यांनी अखेरीस केली आहे. संजय राऊत यांनी या ट्विटमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान कार्यालयाला देखील टॅग केले आहे.

राहुल नार्वेकरांचे स्पष्टीकरण

या प्रकरणाबाबत सभापती राहुल नार्वेकर यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ज्या ठिकाणी ही घटना घडली, तिथून ते केवळ जात होते. तिथे काही लोक सरकारी अधिकाऱ्यांना मारहाण करत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. माणुसकीच्या नात्याने आणि एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून तिथे थांबलो आणि अधिकाऱ्यांना मारहाण करू नका अशी विनंती केली. नार्वेकर यांनी स्पष्ट केले की, त्या ठिकाणी त्यांची कोणतीही जमीन नाही आणि त्यांना तिथे जमीन घ्यायचीही नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT