Maldunge Ration Shop Pudhari
रायगड

Maldunge Ration Shop: मालडुंगेमधील रेशन धान्याची माहिती देण्यास पुरवठा विभागाची टाळाटाळ?

ग्रामपंचायतीचे तहसील कार्यालयाला निवेदन, कारवाईची मागणी

पुढारी वृत्तसेवा

खारघर: मालडुंगे ग्रामपंचायत हद्दीतील रास्त भाव धान्य दुकानामध्ये होणाऱ्या धान्य वितरणाबाबत माहिती मिळवण्यासाठी ग्रामपंचायतीकडून दोन महिन्यांपूर्वी तहसील कार्यालयाला लेखी पत्र देण्यात आले होते.

मात्र अद्यापही पुरवठा विभागाकडून संबंधित माहिती उपलब्ध करून देण्यात आलेली नसल्याने पुरवठा विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मालडुंगे सरपंच सिताराम चौधरी व ग्रामसेवक यांनी तहसील कार्यालयातील पुरवठा अधिकाऱ्यांना लेखी निवेदन देऊन रास्त भाव धान्य दुकानात कोणत्या शिधापत्रिकाधारकांना (पिवळे, केशरी व अंत्योदय) किती प्रमाणात धान्य वितरित केले जाते, कोणत्या कार्डावर माणसी किती प्रमाणे धान्य दिला जातो याची सविस्तर माहिती तसेच धान्य वितरणाचे वेळापत्रक मागवले होते.

मात्र दोन महिने उलटूनही या पत्राला कोणतेही उत्तर देण्यात आले नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. ग्रामपंचायत मालडुंगेचे सरपंच वारंवार या पत्राचा पाठपुरावा करत आहेत.

ग्रामस्थांच्या मते, सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पारदर्शकता राखण्यासाठी ही माहिती आवश्यक असून, सरपंच मालडुंगे ग्रामपंचायतीच्या अधिकृत पत्रालाही प्रतिसाद मिळत नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, पुरवठा विभागाकडून माहिती देण्यास टाळाटाळ होत असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे संबंधित धान्य वितरणाची माहिती नेमकी का दिली जात नाही, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

या प्रकरणी वरिष्ठ प्रशासनाने लक्ष घालून ग्रामपंचायतीला तात्काळ माहिती उपलब्ध करून द्यावी, तसेच सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पारदर्शकता सुनिश्चित करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. याबाबत पुरवठा अधिकाऱ्यांना विचारणा केली असता त्यांनी तेथील कर्मचाऱ्यांना अर्ज शोधण्यास सांगितले मात्र त्यांना अर्ज सापडला नाही.

दोन महिन्यांपूर्वी मी धान्याची माहिती मागवली आहे, यासाठी तहसीलदार कार्यालयात पत्र दिले, मात्र अद्याप उत्तर मिळाले नाही.
- सीताराम चौधरी, सरपंच, मालडुंगे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT