

महेंद्र खैरे
रेवदंडा: रेवदंडा आगरकोट किल्ल्याच्या उत्तर प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऐतिहासिक ‘वन बुरुज’च्या संवर्धनासाठी केंद्रीय पुरातत्त्व विभागाने हाती घेतलेले डागडुजी व दुरुस्तीचे काम सध्या वेगाने सुरू असून, जीर्ण अवस्थेत पोहोचलेल्या या ऐतिहासिक वास्तूला नवसंजीवनी मिळत आहे. शास्त्रोक्त पद्धतीने सुरू असलेल्या या कामामुळे रेवदंड्याच्या समृद्ध ऐतिहासिक वारशाचे जतन होण्यास मोठी मदत होणार आहे.
१६ व्या शतकात पोर्तुगीजांनी उभारलेल्या आगरकोट किल्ल्याच्या या भव्य प्रवेशद्वाराने अनेक ऐतिहासिक घडामोडींची साक्ष दिली आहे.
कालांतराने पावसाचा मारा, झाडांची वाढ आणि नैसर्गिक झीज यामुळे प्रवेशद्वारावरील दगडी बांधकाम, पोर्तुगीज सत्तेचे प्रतीक असलेले क्राऊन शिल्प, तसेच शेजारील कोरीव भाग मोठ्या प्रमाणात जीर्ण झाला होता. त्यामुळे या वास्तूच्या तातडीच्या संवर्धनाची आवश्यकता निर्माण झाली होती.
रेवदंडा संरक्षण सहाय्यक बजरंग येळीकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्या मुंबई मंडळाचे अधीक्षक डॉ. अभिजित आंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे संवर्धन कार्य हाती घेण्यात आले आहे.
सध्या बांबूच्या माचांद्वारे अत्यंत काळजीपूर्वक दगडी बांधकाम मजबूत करण्याचे काम सुरू असून, मूळ स्थापत्याची ऐतिहासिक ओळख आणि वैशिष्ट्ये अबाधित राहतील याची विशेष खबरदारी घेतली जात आहे.
इतिहास अभ्यासकांच्या मते, किल्ल्यांचे प्रवेशद्वार हे केवळ दगडी बांधकाम नसून तत्कालीन लष्करी रणनीती, स्थापत्यकला आणि सांस्कृतिक वैभवाचे प्रतीक आहेत. त्यामुळे अशा ऐतिहासिक वारशाचे जतन करणे ही काळाची गरज असून, केंद्रीय पुरातत्त्व विभागाचा हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद ठरत आहे.
संवर्धनाचे काम पूर्ण झाल्यानंतर रेवदंडा आगरकोट किल्ल्याचा ‘वन बुरुज’ पुन्हा एकदा इतिहासप्रेमी, पर्यटक आणि संशोधकांसाठी प्रमुख आकर्षण ठरणार असून, रेवदंड्याच्या ऐतिहासिक ओळखीला नवे बळ मिळणार आहे.
वास्तूचे मूळ स्वरूप कायम
संवर्धनाच्या कामात प्रवेशद्वारावरील पोर्तुगीज क्राऊन शिल्प, दगडी कमान, तटबंदी, शिलालेख आणि कोरीव स्थापत्य घटकांचे संरक्षण करण्यास प्राधान्य दिले जात आहे. पारंपरिक बांधकाम तंत्र आणि पुरातत्त्वीय निकषांचा अवलंब करून हे काम करण्यात येत असल्याने संवर्धनानंतर वास्तूचे मूळ स्वरूप कायम राहणार आहे.