खोपोली ः प्रशांत गोपाळे
खालापूर तालुक्यातील निगडोली येथे मंगळवारी (26 मे) घडलेल्या वृद्ध दाम्पत्याच्या निर्घृण हत्याकांडाने संपूर्ण रायगड जिल्हा हादरला आहे. आरोपीने घटनास्थळी कोणताही ठोस पुरावा अथवा धागेदोरे मागे न ठेवल्यामुळे पोलिसांनी आता कसून चौकशीचे सत्र हाती घेतले आहे. तपासाचा भाग म्हणून आज दिवसभरात परिसरातील सुमारे 30 संशयितांची सखोल चौकशी करण्यात आली असून, वेगवेगळ्या बाजूंनी तपास पथके आरोपीच्या मागावर रवाना झाली आहेत.
बँकेतून सेवानिवृत्त झालेले रघुनाथ दत्तू फराट (वय 72) आणि त्यांच्या पत्नी सुरेखा रघुनाथ फराट (वय 68) या वृद्ध दाम्पत्याची त्यांच्या राहत्या घरात गळा कापून हत्या करण्यात आली होती. मृत सुरेखा फराट या राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या सख्ख्या आत्या असल्याने, घटनेची माहिती मिळताच घारे यांनी रात्रभर घटनास्थळी ठाण मांडले होते.
या थरारक हत्याकांडात आरोपीने अत्यंत क्रूरतेचा कळस गाठल्याचे समोर आले आहे. रघुनाथ फराट यांचा गळा कापण्यात आला होता, तर सुरेखा फराट यांच्या तोंडावर गंभीर वार करण्यात आले होते. धक्कादायक बाब म्हणजे, हत्येनंतर ओळख पटू नये किंवा पुरावे नष्ट व्हावेत या उद्देशाने आरोपीने सुरेखा फराट यांच्या मृतदेहावर राख आणि पालापाचोळा टाकला होता. मंगळवारी दिवसभर मुलाने फोन करूनही प्रतिसाद न मिळाल्याने नातू आदित्य फराट याने रात्री घरात जाऊन पाहिले असता, हा संपूर्ण धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
तपासाची चक्रे गतिमान; अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल, अप्पर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवतरे यांनी रात्री उशिरा निगडोली येथील घटनास्थळाला भेट देऊन तपासाची दिशा निश्चित केली. फॉरेन्सिक लॅब आणि श्वानपथकाला पाचारण करण्यात आले असून, तांत्रिक आणि वैज्ञानिक पुराव्यांच्या आधारे तपास सुरू आहे.
या दुहेरी हत्येप्रकरणी खालापूर पोलीस ठाण्यात अज्ञात मारेकऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खालापूर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल नेहूल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिन पवार आणि त्यांचे विशेष तपास पथक या गुन्ह्याचा उकल करण्यासाठी दिवस-रात्र प्रयत्न करत आहे.