पोलादपूर शहर (रायगड) : पोलादपूर तालुक्यात यंदाही गणरायाचं दिमाखदार स्वागत मोठ्या जल्लोषात आणि भक्तिभावाने करण्यात आलं आहे. ढोल-ताशांच्या गजरात, झांज-पठाख्यांच्या निनादात आणि पारंपरिक लोकवाद्यांच्या सुरेल साथीने गावागावांमध्ये, वाड्यावस्त्यांमध्ये गणपती बाप्पाचं आगमन थाटामाटात झालं.
संपूर्ण तालुक्यात सणासुदीचे आणि भक्तिभावाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावर्षीही पोलादपूर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने हा उत्सव शहराच्या मध्यवर्ती भागात पारंपरिक उत्साह आणि एकत्रतेने साजरा होत आहे. मंडळाने शास्त्रशुद्ध पद्धतीने पूजा-अभिषेक आणि दररोजच्या सायंकाळच्या आरतीचे आयोजन केले असून, यामध्ये नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. यावर्षी गणेशमूर्तीची सजावट आकाश तारकांच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली असून, हे दृश्य पाहण्यासाठी पोलादपूरकरांची गर्दी होत आहे.
मंडळाचे अध्यक्ष दर्पण दरेकर, सर्व पदाधिकारी, तसेच आजी-माजी सल्लागार मंडळाच्या सहकार्याने उत्सव अत्यंत सुयोजितरीत्या पार पडत आहे. यंदा ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान, भजन-कीर्तन यांसारख्या उपक्रमांनी भक्तिमय वातावरणात अधिक भर पडली आहे. विसर्जनाच्या दिवशी संपूर्ण गावातून भव्य मिरवणूक काढण्यात येते. विशेष आकर्षण म्हणजे 108 ताटांचा महानैवेद्य, जो बाप्पाला अर्पण करून नंतर बाळगोपाळांमध्ये वाटण्यात येतो. यानंतर गावातून प्रदक्षिणा करत बाप्पाचं विसर्जन घाटावर विसर्जन करण्यात येते.
हा पावन सोहळा पाहण्यासाठी केवळ पोलादपूरच नव्हे, तर पुणे, मुंबई आणि इतर शहरांतूनही आजी-माजी सदस्य, भक्तगण मंडळाला भेट देत आहेत. बाप्पाच्या सेवेत संपूर्ण पोलादपूरकर एकजुटीने सहभागी होत असून, गावकर्यांच्या एकत्रतेचा आणि श्रद्धेचा अद्वितीय अनुभव यावर्षी पुन्हा अनुभवायला मिळत आहे.एक गाव, एक गणपती’ ही संकल्पना केवळ धार्मिक नव्हे, तर सामाजिक ऐक्याचाही उत्कृष्ट आदर्श ठरत आहे.