अतिवृष्टीमुळे पोलादपूर तालुक्यातील शेतकरी हवालदिल pudhari photo
रायगड

Raigad heavy rainfall : अतिवृष्टीमुळे पोलादपूर तालुक्यातील शेतकरी हवालदिल

भातासह नाचणीचे पीक संकटात; नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याची शेतकर्‍यांची मागणी

पुढारी वृत्तसेवा

पोलादपूर : समीर बुटाला

तालुक्यात यंदाचा पावसाळा शेतकर्‍यांसाठी संकटाचे ढग घेऊन आला आहे. नऊ मेपासून सुरू झालेला आणि अविरत सुरू असलेला मुसळधार पाऊस सलग पाच महिन्यांपासून कोसळत असून ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले होते. ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता मात्र या परिस्थितीचा सर्वाधिक फटका शेतीला बसला असून शेतकरी हवालदिल झाले आहेत.

पोलादपूर तालुक्यात एकूण भात लागवड क्षेत्र हे 2581.55 हेक्टर क्षेत्रात भात लागवड केली जाते तसेच नाचणी एकूण 195.65 हेक्टर क्षेत्रात केली जाते तर फल फळबाग 125 हेक्टर आहे. सध्या अति पावसाचे प्रमाण पाहता ही भात शेती पिके धोक्यात आलेले आहेत, त्यामुळे कृषी विभागाने पंचनामा करून शेतकर्‍यांना नुकसान भरपाई देण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याची मागणी शेतकर्‍यांकडून होत आहे.

तालुक्यातील भात शेती हे प्रमुख पीक असून ते पावसावर अवलंबून आहे. सध्या रोपे हिरवीगार दिसत असली तरी पाणथळ झालेल्या शेतांमध्ये रोपे कुजण्यास सुरुवात झाली आहे. त्यात भर म्हणजे भात शेतीवर निळे भुंगेरे या किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे. ही किड पानांना दुमडून आतून कुरतडते, ज्यामुळे अन्ननिर्मिती प्रक्रिया विस्कळीत होते, झाडांची वाढ खुंटते आणि उत्पादनावर गंभीर परिणाम होतो. कोकण पट्ट्यात करपा, कडाकरपा, शेंडे करपा, पर्णकोष करपा, आभासमय काजळी, उदबत्ता असे रोग सामान्यतः दिसून येतात.

देवळे गावचे युवा शेतकरी रवींद्र केसरकर यांनी सांगितले, सलग सहा महिन्यांपासून पाऊस सुरू आहे. पिकांचे मोठे नुकसान होत आहे. सरकारने आता तरी ओला दुष्काळ जाहीर करून तात्काळ पंचनामे करावेत. अन्यथा परिस्थिती गंभीर होईल आणि ग्रामीण भागातील तरुण शेती सोडून शहरांकडे धाव घेतील.

शेतकरी रामचंद्र केसरकर यांनी या नुकसानीविषयी सांगितले, पंचक्रोशीतील शेतकर्‍यांची सर्व मेहनत पावसाने वाहून नेली. सुरुवातीलाच जर शेतकरी खचला तर तो सावरणार कसा? शेतकर्‍यांचे भविष्य मोठ्या संकटात आले आहे.

सध्या पिके रोगराई व पूरपरिस्थितीमुळे उध्वस्त होत असताना खत आणि कीटकनाशकांच्या दरात झालेली प्रचंड वाढ शेतकर्‍यांच्या चिंतेत भर घालत आहे. नुकसान सहन करणे आणि त्यावर मात करणे हे दोन्ही शेतकर्‍यांसाठी अशक्यप्राय होत आहे. कृषी तज्ञांनी शेतकर्‍यांना खालीलप्रमाणे मार्गदर्शन केले आहे. निळे भुंगेरे नियंत्रणासाठी शिफारस केलेली औषधे फवारावीत. शेतांमध्ये पाणी तुंबू नये यासाठी योग्य निचर्‍याची सोय करावी. रोग व कीड नियंत्रणासाठी स्थानिक कृषी विभागाशी संपर्क साधावा.

शेतकर्‍यांचा ठाम आग्रह आहे की, सरकारने तातडीने परिस्थितीची दखल घेऊन ओला दुष्काळ जाहीर करावा, पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी आणि शेतीसाठी प्रोत्साहनपर योजना राबवाव्यात. अन्यथा ग्रामीण भागातील शेती व शेतकरी दोघांचेही भविष्य धोक्यात येईल. ही परिस्थिती लक्षात घेता पोलादपूर तालुक्यातील शेतकर्‍यांच्या मदतीसाठी शासनाने त्वरित पावले उचलणे आवश्यक झाले आहे.

वरीचे पीकही बाधित

तालुक्यातील डोंगर भागातील करंजे, लहुलसे, दाभिल चिरेखिंड परिसर नाचणी शेतीसाठी ओळखला जातो. स्थानिक शेतकर्‍यांचे संपूर्ण जीवन या नगदी पिकावर अवलंबून आहे. मात्र मुसळधार पावसामुळे नाचणीच्या जे तापमान लागते ते मिळाले नसल्याने नाचणी, वरी पिके बाहेर आलीच नाहीत.

खरीप हंगामात पिकांचे योग्य व्यवस्थापन केल्यास उत्पादनात घट होण्याचे प्रमाण कमी करता येते. शेतकरी बांधवांनी शंका अथवा मदतीसाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालय, पोलादपूर तसेच क्षेत्रीय मंडळ कृषी अधिकारी, उपकृषी अधिकारी किंवा गावस्तरीय सहायक कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.
वैशाली फडतरे, तालुका कृषी अधिकारी, पोलादपूर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT