उरण : उरणचा मरीन ड्राईव्ह म्हणून ओळख असलेल्या पिरवाडी किनाऱ्याचे आत्ता सुशोभिकरण करण्यात येणार आहे. उरणमधील पर्यटनाचा चेहरामोहरा बदलणाऱ्या आणि स्थानिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या ठरलेल्या पिरवाडी-नागाव समुद्रकिनारा सुशोभीकरण व संरक्षक बंधारा कामाचा शुभारंभ आमदार महेश बालदी यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रकल्पाच्या भूमिपूजनामुळे उरणच्या विकासाच्या प्रवासात एक नवा अध्याय सुरू झाला असून, गेल्या अनेक वर्षांपासून उरणकरांनी पाहिलेले सुंदर आणि सुरक्षित समुद्रकिनाऱ्याचे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरणार आहे.
पिरवाडी आणि नागाव हे समुद्रकिनारे पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहेत. मात्र, समुद्राच्या लाटांमुळे होणारी धूप आणि सोयीसुविधांचा अभाव ही मोठी समस्या होती. या प्रकल्पांतर्गत उभारण्यात येणारा मजबूत संरक्षक बंधारा केवळ लाटांपासून जमिनीचे रक्षण करणार नाही, तर पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी येथे अत्याधुनिक सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत. सुशोभिकरणाच्या पहिल्या टप्प्यात पुढील कामे करण्यात येणार आहेत.
आरोग्यासाठी जॉगिंग ट्रॅक: सकाळी आणि संध्याकाळी फेरफटका मारण्यासाठी सुसज्ज ट्रॅक., आकर्षक रोषणाई: रात्रीच्या वेळी किनाऱ्याचे सौंदर्य खुलवण्यासाठी विशेष लायटिंग, बैठक व्यवस्था: ज्येष्ठ नागरिक आणि पर्यटकांसाठी ठिकठिकाणी बाक, सुरक्षितता: लाटांचा प्रभाव रोखण्यासाठी मजबूत आणि सुशोभित संरक्षक भिंत.
महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाकडून हे काम करण्यात येणार असून या कामासाठी सुमारे 10.32 कोटी रूपयांची प्रशासकीय मान्यता असून सदर कामाचे टेंडरसुद्धा मंजूर झाले आहे. सशोभिकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात शोभेची झाडे, जॉगिंग ट्रॅक, लहान मुलांसाठी खेळणी, ओपन जीम सारखी व्यवस्था करण्यात येणार आहे. या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी रवी भोईर (सदस्य, भाजपा महाराष्ट्र राज्य परिषद), कौशिक शाह (भाजपा उरण शहर अध्यक्ष), जयविंद्र कोळी (नगरसेवक), प्रसाद भोईर (भाजपा मंडळ अध्यक्ष, उरण तालुका शहर), निलेश पाटील (भाजपा युवा शहर अध्यक्ष, उरण) यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच नागाव आणि म्हातवली ग्रामपंचायतीचे सदस्य, भाजपाचे सर्व पदाधिकारी आणि उरणमधील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. रायगड जिल्हयातील समुद्र किनारे सुंदर असून येथे पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अलिबाग, मुरुड आणि श्रीवर्धन तालुक्यातील समुद्र किनारे पर्यटन दृष्ट्या विकसित होत आहेत. मात्र उरण तालुक्यातील समुद्र किनारे पर्यटनदृष्टीने विकास होण्याची गरज आहे.
या प्रकल्पाबाबत बोलताना मान्यवरांनी सांगितले की, ‘उरणला एक नवी आणि देखणी ओळख प्राप्त करून देणे हाच आमचा उद्देश आहे. या कामामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला बळ मिळेल आणि पर्यटकांची वर्दळ वाढून रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील.‘ या विकासकामामुळे उरणच्या वैभवात भर पडणार असल्याने सर्वत्र आनंद व्यक्त केला जात आहे.