Phansad Wildlife Sanctuary Pudhari
रायगड

Phansad Wildlife Sanctuary: पावसाच्या पुनरागमनामुळे फणसाड अभयारण्यातील पर्यटन पुन्हा बहरणार; हिरवाईमुळे निसर्गसौंदर्य शिगेला

निसर्गप्रेमी, पक्षी निरिक्षकांसह पर्यटकांना खुणावतेय जैवविविधता

पुढारी वृत्तसेवा

सुधीर नाझरे

मुरुड जंजिरा: मोसमी पाऊस परतीच्या मार्गावर असताना पुन्हा जोर पकडू लागला असून वातावरण आल्हाददायक बनत आहे. निसर्गप्रेमींसाठी ही पर्वणी ठरत आहे. यामुुळे मुरुड तालुक्याील फणसाड अभयारण्याकडे निसर्गप्रेमी, पक्षी निरीक्षक, पर्यटकांची पावले वळणार आहेत. त्यामुळे फणसाड अभयारण्यातील पर्यटन पुन्हा बहरणार आहे. दरवर्षी मोठ्या प्रमाणात पर्यटक फणसाड अभयारण्याला भेट देत असतात.

मुरुड तालुक्यातील फणसाड अभयारण्याला जणु निसर्गाचा वरदहस्तच लाभलेला आहे. सध्या पाऊस परतीच्या मार्गावर असल्याने अभयारण्य निसर्ग सौंदर्याने भरभरून वाहू लागला आहे.

विविध प्रकारचे पशुपक्षी आणि वनस्पती यामुळे सध्याचे वातावरण पर्यटकांची आकर्षण ठरते. मुंबईपासून १५४ किमी अंतरावर पनवेल-पेण-अलिबाग मार्गावर ५२ चौरस कि.मी. क्षेत्रावर विस्तारलेला आहे.

स्वातंत्र्यपूर्व काळात 'फणसाड अभयारण्याचे क्षेत्र मुरुड जंजिरा संस्थानाचे सर्वेसर्वा नवाब सिद्दी यांचे राखीव शिकार क्षेत्र होते. येथील जैवविविधतेचे संरक्षण व्हावे या हेतूने महाराष्ट्र शासनाने २५ फेब्रुवारी १९८६ मध्ये फणसाड वन्यजीव अभयारण्य घोषित केले.

भारतातून हजारो पर्यटक फणसाडला भेट देतात आणि खासकरून पावसाळी अतिशय सुंदर वातावरण असते. घनदाट झाडी असल्याने पाऊसाचे प्रमाण खूप आहे आणि उंचावर असल्याने पाऊसात धुक्यासारखे वातावरण असते, शेकडो पाणवठे पाऊसच्या पाण्यानी भरून जातात, प्राणी जलक्रीडा करण्यासाठी पाणवट्यावर येतात.

फणसाड धारण फुल्ल भरून त्याच्या वाहून जाणाऱ्या पाण्याचा आनंद घेण्यासाठी हजारो पर्यटक बोर्लीमांडला मार्गे भोईघर गावात येतात.

गावातून धारण १० मिनिटावर असल्याने गावाला पर्यटन व्यवसाय मिळतो, फणसाड धबधब्याला हिराव्यागार भातशेतातून जाण्याचा आनंद काही वेगळाच असतो यावर्षी फणसाडला पर्यटकांची संख्या वाढणार कारण निसर्गप्रेमींना मुंबई पुण्याहून तीन तासांवर फणसाड असल्याने एका दिवसात पाहून जात येते.

फणसाडमध्ये नदीकाठची वने अशा या वैविध्यपूर्ण जंगलात सुमारे ७१८ प्रकारचे वृक्ष, १७ प्रकारचे सस्तन प्राणी, १६४ प्रकारचे रंगीबेरंगी पक्षी, २७ प्रकारचे साप व अनेक वन्य श्वापदे आढळतात. पश्चिम घाटांतर्गत येणाऱ्या या भूप्रदेशाचे उष्णकटीबंधीय हवामान असून तापमान किमान २५ ते कमाल ३५ अंश सेल्सीयस इतके असते. सरासरी २८०० मिलीमीटर पावसाची नोंद येथे घेण्यात आली आहे.

फणसाड वन्यजीव अभयारण्यात १७ प्रकारचे वन्यप्राणी आहेत. यामध्ये रानससा, सांबर, भेकर, पिसोरी, साळींदर, तरस, रानडुक्कर, मुंगूस, कोल्हा, वानर, माकड, रानमांजर व बिबट्या आणि पर्यटकांच्या व अभ्यासकांचे आकर्षण असलेले 'शेकरू' येथे हमखास दृष्टीस पडते. अभयारण्यात भटकंतीसाठी विशेष वाटा तयार केल्या आहेत. त्यात फणसाडगाण, धरणाधीमान, चिखलगाण, सावर तलाव सुपेगाव देवराई याचा समावेश आहे.

गाण म्हणजे पाण्याची जागा. फणसाड वन्यजीव अभयारण्यात तम्बल २७ पाणस्थळे आहेत. यातील चिखलगाया पाणस्थळावर अनेक पक्षी, प्राणी येतात. त्यांचे जवळून निरीक्षण करता यावे येथे खास एकलगृह बांधण्यात आले आहे.

तसेच पुण्याचा माळ, चाकाचा माळ, दांडा, गाडग्याचा माळ या ठिकाणी निरीक्षणासाठी उंच मनोरे उभारण्यात आले आहेत. यातून दिसणारे दृष्य मन मोहून टाकते. जांभा दगडातील नवाबाने खास शिकारीसाठी बांधले आडोसे जागोजागी आजही पहावयास मिळतात.

जगातील सर्वात लांब वेल गारंबीचा आढळ

फणसाड अभयारण्यात साग व निलगिरीची रोपवने यासह प्रामुख्याने ऐन, किंजळ, जांभूळ, द्वेद, कुडा, गेळा, अंजनी, कांचन, सावर, अर्जुन हे वृक्ष व कर्करोगावर गुणकारक नरक्या याबरोबरच सीताअशोक, सर्पगंधा, कुरडु, रानतुळस, कढीपत्ता उक्षी या औषधी वनस्पती मोठ्या प्रमाणात आढळून येतात. वाकेरी, वाघाटी, पळसवेल, पेंटगुळ इत्यादी प्रकारच्या वेली व जगातील सर्वात लांब वेलींपैकी एक असलेली गारंबीची वेल येथे आढळते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT