पाली : दीव येथील घोगला बीचवर रंगलेल्या दुसऱ्या खेलो इंडिया बीच गेम्समध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंनी आपल्या अंगी असलेले कसब, जिद्द आणि शिस्तबद्ध खेळाचे दर्शन घडवत राज्याचा झेंडा उंचावला आहे. पिंच्याक सिलॅट या आंतरराष्ट्रीय मार्शल आर्ट प्रकारातील रेगू (सांघिक) इव्हेंटमध्ये महाराष्ट्राच्या पुरुष संघाने दमदार कामगिरी करत रौप्य पदक पटकावले.
या यशस्वी संघात रायगड जिल्ह्यातील पाली येथील युवा खेळाडू अनुज सरनाईक याचा समावेश असल्याने पाली शहरासह संपूर्ण रायगड जिल्ह्यात अभिमानाची भावना निर्माण झाली आहे. दीव, दमण, दादरा आणि नगर हवेली येथे 5 ते 10 जानेवारी 2026 या कालावधीत या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पिंच्याक सिलॅटच्या रेगू प्रकारात अनुज सरनाईक, अंशुल कांबळे आणि मुकेश चौधरी या महाराष्ट्राच्या त्रिकुटाने उत्कृष्ट समन्वय, वेगवान हालचाली, अचूक फटके आणि तांत्रिक कौशल्याच्या जोरावर प्रतिस्पर्ध्यांना कडवी झुंज दिली. प्रत्येक सामन्यात त्यांनी संयम, आत्मविश्वास आणि आक्रमक खेळाचे दर्शन घडवत प्रेक्षकांची दाद मिळवली आणि अखेर रौप्य पदकावर शिक्कामोर्तब केले.
विजेत्या खेळाडूंना भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या डेप्युटी डायरेक्टर भाविनी मॅडम यांच्या हस्ते पदके प्रदान करून गौरविण्यात आले. पदक वितरणावेळी खेळाडूंच्या चेहऱ्यावर समाधान, आनंद आणि पुढील वाटचालीचा आत्मविश्वास स्पष्ट दिसून येत होता.महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवा सेवा संचालनालयाचे अप्पर संचालक नवनाथ फडतरे, इंडियन पिंच्याक सिलॅट फेडरेशनचे अध्यक्ष किशोर येवले, सीईओ मोहम्मद इक्बाल, तसेच क्रीडा अधिकारी व महाराष्ट्र संघ व्यवस्थापक नेहा साप्ते यांनी खेळाडूंच्या मेहनतीचे विशेष कौतुक करत पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
पाली येथील अनुज सरनाईक याने खेलो इंडिया बीच गेम्ससारख्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत मिळवलेल्या यशामुळे रायगड जिल्ह्याच्या क्रीडा इतिहासात मोलाची भर घातली आहे. ग्रामीण भागातील खेळाडूही कठोर मेहनत, योग्य प्रशिक्षण आणि सातत्याच्या जोरावर राष्ट्रीय पातळीवर आपली ओळख निर्माण करू शकतात, हे अनुजने आपल्या कामगिरीतून पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. विशेष म्हणजे, अनुजने यापूर्वीही पिंच्याक सिलॅट या क्रीडा प्रकारात राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक पदके आणि सन्मान मिळवले असून यशामुळे स्थानिक तरुण खेळाडूंना नवी प्रेरणा मिळत आहे.