रायगड: रायगड जिल्ह्यातील पेण आणि आसपासच्या परिसराचा तिसरी मुंबई म्हणून वेगाने विकास करण्याची तयारी सुरू झाली आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी तब्बल एक लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मात्र, या वेगवान औद्योगिकीकरण आणि नागरीकरणाच्या पार्श्वभूमीवर, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली पेण-पनवेल थेट लोकल सेवा सुरू करण्याची मागणी आता अधिकच जोर धरू लागली आहे.
मुंबई महानगरपालिकेचे निवृत्त अभियंता जीवन पाटील यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहून पेण-पनवेल लोकल तातडीने सुरू करण्याची मागणी केली आहे. परंतु, रेल्वे प्रशासनाकडून अद्याप कोणतेही ठोस आश्वासन मिळालेले नसल्याने स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी आहे. तिसरी मुंबई उभी करण्यापूर्वी रेल्वे पायाभूत सुविधा सक्षम करणे गरजेचे असल्याची भूमिका स्थानिक नागरिकांकडून घेतली जात आहे.
वाढत्या नागरीकरणामुळे वाहतुकीचा ताण
मुंबई-गोवा महामार्गाचे रुंदीकरण, जेएनपीएचा विस्तार, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा वाढता प्रभाव आणि अलिबाग-रायगड परिसरातील पर्यटनामुळे पेणचे महत्त्व कमालीचे वाढले आहे. पेण ग्रोथ सेंटर प्रकल्पामुळे पेण, रसायनी आणि नागोठणे परिसरात औद्योगिक क्रांती होवू घातली आहे.
सध्या पेण, अलिबाग, नागोठणे आणि रोहा भागातील हजारो नागरिक रोज नोकरी, व्यवसाय आणि शिक्षणासाठी मुंबई, नवी मुंबई आणि पनवेलच्या दिशेने प्रवास करतात. मात्र, थेट लोकल सेवा उपलब्ध नसल्याने या प्रवाशांना एसटी बस, खाजगी वाहने किंवा महामार्गावरील वाहतुकीवर अवलंबून राहावे लागत आहे. परिणामी, वाहतूक कोंडी, वाढते अपघात आणि प्रवासाचा अवाढव्य खर्च या समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे.
एसटी बसेसची मर्यांदीत संख्या,प्रवाशांचे हाल सध्या पेण ते पनवेल दरम्यान धावणाऱ्या एक्सप्रेस आणि मेमू गाड्यांची संख्या अत्यंत मर्यादित आहे. नियमित लोकल नसल्यामुळे सकाळी आणि संध्याकाळी प्रवाशांची तुफान गर्दी होते. सकाळी आणि संध्याकाळी 6 ते 9 या गर्दीच्या वेळेत पनवेल आणि मुंबईहून पेणकडे येणाऱ्या एसटी बसेसची संख्या अत्यंत कमी आहे. त्यामुळे नोकरदार महिला, विद्यार्थी आणि दिव्यांग प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.
लोकल सेवा सुरू झाल्यास होणारे फायदे लोकल सेवा सुरु झाल्यास त्यातून अनेक फायदे प्राप्त होणार आहेत. रोज प्रवास करणाऱ्या हजारो नागरिकांचा प्रवासाचा वेळ आणि आर्थिक भुर्दंड कमी होईल.महामार्गावरील वाहनांचा आणि वाहतुकीचा ताण लक्षणीयरीत्या कमी होईल.थेट रेल्वे संपर्क मिळाल्यास औद्योगिक गुंतवणूक वाढेल आणि रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील.
अलिबाग आणि रायगड जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्राला मोठा चालना मिळेल.मुंबई महानगर प्रदेशाचा विस्तार रायगडकडे वेगाने होत असताना, केंद्र सरकार आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन पेण-पनवेल लोकलचा प्रश्न त्वरित मार्गी लावावा, अशी मागणी आता स्थानिकांमधून केली जात आहे.