प्रकाश माळी
वढाव: पेण तालुक्यातील वाशी-शिर्की खारेपाट परिसरासाठी जीवनदायी ठरलेल्या शहापाडा धरणातील गाळ काढण्याच्या कामाला तब्बल 22 वर्षानंतर मुहुर्त सापडला असून, प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. गाळ काढण्याचे काम पूर्ण झाल्यावर यंदाच्या पावसाळ्यात गाळ पूर्णपणे धरणाबाहेर जावून धरणातील जलसंकलनात वाढ होणार असून, खारेपाटातील गावांना पाणी पुरवठा करण्याचा मार्ग सुकर होणार आहे.
गाळ बाहेर काढण्यासाठी धरणाच्या खालचा दरवाजा उघडला
गेल्या अनेक वर्षां पासून प्रलंबित असलेला पेण तालुक्यांतील एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न अखेर जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर म्हात्रे यांच्या प्रयत्नाने मार्गी लागला आहे. तब्बल 22 वर्षांहून अधिक काळ शहापाडा धरणात साठलेला गाळ बाहेर टाकण्याचा धरणाच्या खालचा दरवाजा 11 एप्रिल रोजी तांत्रिक दुरुस्ती करून पुन्हा सुरू करण्यात आला.
अनेक वर्षां पासून गाळ बाहेर टाकण्याची प्रक्रिया पूर्णपणे बंद असल्यामुळे धरणातील गाळ सातत्याने वाढत गेला होता. त्यामुळे पावसाळ्यात येणारा गाळ साठून धरणाची जलसंकलन क्षमता घटत गेली. आता हा दरवाजा उघडल्यामुळे आगामी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर गाळ बाहेर टाकणे शक्य होणार असून, धरणाच्या पुनरुज्जीवनाची प्रक्रिया वेग घेणार आहे.
0.28 दशलक्ष घनमीट जलसाठा संकलनात घट
शहापाडा धरणाची मूळ साठवण क्षमता सुमारे 0.92 दशलक्ष घनमीटर इतकी होती, मात्र दीर्घकाळ गाळ न काढल्यामुळे ही क्षमता सध्याच्या घडीला सुमारे 0.64 दशलक्ष घनमीटर पर्यंत घसरली आहे. म्हणजेच सुमारे 0.28 दशलक्ष घनमीटर, अंदाजे 280 कोटी लिटर पाणी साठवण्याची क्षमता कमी झाली होती.
शहापाडा धरणाची उभारणी ही खारेपाटातील लोकांच्या जीवनात परिवर्तन घडवणारी घटना होती. माजी खासदार बॅरीस्टर ए.टी. पाटील यांच्या अथक प्रयत्नाने 1964 साली या धरणातून 52 गावांना पाणीपुरवठा सुरू झाला आणि तीव्र टंचाईवर मोठा दिलासा मिळाला. त्या आधी लोक तलाव, डवरे खोदून किंवा आपट्या सारख्या दूरवरून पाणी आणून वापरत होते. मात्र कालांतराने या योजनेतील पाइपलाइन जुनी झाली, देखभाल कमी झाली, योजना कालबाह्य झाली आणि लोकसंख्या वाढूनही व्यवस्थापनात अपेक्षित सुधारणा झाल्या नाहीत. परिणामी, गावांची संख्या कमी होऊनही पाणीटंचाई कायम राहिली.
वाशी-शिर्की परिसरातील पाणीटंचाई कमी होणार
अलीकडेच पेणचे आमदार रविंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत या समस्येवर उपाय योजना करण्यासाठी विविध निर्णय घेण्यात आले होते. त्यामध्ये गाळ काढणे, फ्लो मीटर बसवणे, बूस्टर पंप बसवणे आणि महत्त्वाचे म्हणजे धरणाचा खालचा दरवाजा उघडणे या कामांचा समावेश होता.
या पार्श्वभूमीवर स्थानिक लोकप्रतिनिधींच्या पुढाकाराने आणि तांत्रिक सहकार्याने दरवाजा दुरुस्त करून कार्यान्वित करण्यात आला. या कामामुळे आता पावसाळ्यात गाळ धरणा बाहेर टाकणे शक्य होणार असून धरणाची साठवण क्षमता वाढण्यास मदत होईल. त्यामुळे वाशी-शिर्की खारेपाटातील पाणीटंचाई आता कमी होण्याची आशा व्यक्त केली जात आहे.