पेण शहर : पेण तालुक्यातील वाशी वडखळ विभागातील 13 ग्रामपंचायती हद्दीतील 70 हजार लोकवस्तीला येत्या आठवडाभरात आठवड्या तून एक दिवस पाणी पुरवठा होणार आहे.असे पत्र संबंधित सरपंच, प्रशासकांना जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा कार्यालयने पाठविल्याने संतप्त झालेल्या माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती संजय जांभळे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्थानिक लोकप्रतिनिधीचे पाणी टंचाई समस्येवर उपाययोजना न केल्यामुळे जनतेला तीव्र पाणीटंचाई समस्येला जानेवारी महिन्यापासून सामोरे जावे लागणार आहे.
या समस्येवर आता जनतेने उठाव करून आगामी निवडणुकीत हा मुद्दा लोक प्रतिनिधी समोर ठेऊन यांना गाव बंदी करावी असे खारेपाटातील जनतेला पत्रकार परिषदेतून आवाहन केल्याने ऐन जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूकीचत पाणी टंचाई समस्येची पोलखोल केल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापाणार आहे.
केंद्र व राज्य शासनाची जल जीवन मिशन योजनेतील निकृष्ट कामामुळे जनतेला पाणी मिळत नाही. जे जलकुंभ बांधलेत त्यात अजूनही थेंबभर पाणी सोडले गेले नाही. काही ठिकाणी जलकुंभ लिकेजेस असल्याने यात झालेला करोडोचा भष्टाचार याबाबत जनतेने आवाज उठविण्यासाठी या निवडणुकीत सज्ज रहाण्याचेही त्यांनी आवाहन केले.
38 कोटीची योजनेचा बोजवारा उडाला असून आठवड्यात दोन वेळा पाईपलाईन ब्रेक होऊन पाणीपुरवठा विस्कळीत होतो गेली 25 वर्ष पाणी टंचाईचा सामना खारेपाटातील जनतेला उन्हाळ्यातील पाच महिने सोसावा लागतो. उपाययोजनेबाबत स्थानिक नेत्यांनी याकडे का लक्ष दिले नाही . हेटवणे धरण भूमीगत कालव्याचे कामामुळे शेतकरी बांधवांचे उन्हाळ्यातील शेती लागवड नसल्याने उत्पन्न बुडाले आहे.
खरीप हंगामातील उत्पादन अतिवृष्टी सततचा पाऊस पडल्याने मातीमोल झाले. अशा परिस्थितीत पाणी टंचाई संकट जनतेच्या जीवावर उठत असल्याने एक जनतेचा सेवक म्हणून मी याबाबत खारेपाटातील जनतेच्या पाठीशी या समस्येची लढा देण्यासाठी सुदैव तत्पर राहीन असे सांगितले. याबाबत पत्रकारांनी आपण निवडणूक उमेदवारी करणार का या प्रश्नावर उत्तर देताना इंडीया आघाडीच्या नेत्यांनी मला याबाबत बोलवून विचारणा केली आहे. वडखळ जिल्हा परिषद मतदार संघाचे मी दोन टर्म मधे प्रतिनिधित्व करुन बांधकाम सभापती पद सांभाळले आहे.
नेतेमंडळीची गरज व जनतेला माझ्या उमेदवारीची गरज लक्षात घेऊन इंडिया आघाडीचे नेते याबाबत बैठक घेऊन विचारविनिमय करीत आहेत. माझी उमेदवारी त्यांनाआणि जनता जनार्दनाला हवी आहे. त्यामुळे दोन दिवसांत याबाबत अपेक्षीत निर्णय शेकापचे भाई जयंत पाटील घेतील त्या वेळी आपणास सांगितले जाईल. पण उमेदवार म्हणून मी जनतेसाठी उभा राहणार हे निश्चित आहे.
संजय जांभळे यांची जिल्हा परिषद वडखळ गटात उमेदवारी ही मोठी लक्षणीय बाब ठरणार असून भाजपा महायुतीसाठी ती आव्हानात्मक ठरणार आहे. पाणी टंचाई हा सध्या मोठा भीषण प्रश्न समस्या असून याबाबत प्रशासन व लोकप्रतिनिधी काय उपाययोजना करतात याकडे मी अधिक लक्ष केंद्रित करीन. निवडणूका दर पाच वर्षांनी येतात जातात पण जनतेसाठी काम करणारा धावून जाणारा सच्चा लोकप्रतिनिधीची निवड हाच माझा आज पत्रकार परिषदेतून जनतेला मतदारांना आवाहन आहे. नेत्यांच्या भूलथापांना बळी पडू नका आठवड्यात एकदा पिण्याचे पाणी हे खारेपाटातील जनतेसाठी गंभीर समस्येचे प्रतिक असल्याचं सांगितले.