Ganesh Idol Damage Pudhari
रायगड

Ganesh Idol Damage: पेणला गणेशमूर्तीकारांना पावसाचा फटका; ५० हजार मूर्ती बाधित, रंगसाहित्यांसह ,साच्यांचे नुकसान

शासनाकडून वेळेत भरपाई मिळाल्यास हा उद्योग पुन्हा उभारी घेईल, अशी प्रतिकिया मूर्ती कारखानदारांकडून करण्यात येत आहे.

पुढारी वृत्तसेवा

पेण: पेणमध्ये गणेशमूर्तीकारांना पावसाचा फटका बसला असून,परिसरातील ४३७ कारखाने बाधित झाल्याने त्यामधील ५०हजार मूर्तींना नुकसानीची झळ बसली आहे. रंगकामाचे साहित्य, साचे, शाडूची माती आणि कच्च्या मालाचे मोठे नुकसान झाले आहे. गणेशोत्सवाला अवघे काही दिवस शिल्लक असताना मूर्तिकारांसमोर आता ग्राहकांच्या ऑर्डर वेळेत कशा पूर्ण करायच्या, हा मोठा प्रश्न उभा ठाकला आहे.

नुकसानीमुळे कोट्यवधी रुपयांचा फटका बसला असून, या पारंपरिक व्यवसायावर अवलंबून असलेल्या पाच हजारांहून अधिक कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाकडून वेळेत भरपाई मिळाल्यास हा उद्योग पुन्हा उभारी घेईल, अशी प्रतिकिया मूर्ती कारखानदारांकडून करण्यात येत आहे.

पेणच्या गणेशमूर्तीना केवळ रायगड किंवा महाराष्ट्रातच नव्हे, तर देश-विदेशात मोठी मागणी आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मूर्तिकार वर्षभर मेहनत घेऊन बाप्पाच्या विविध आकर्षक मूर्ती साकारतात. यंदाही गणेशोत्सवासाठी मोठ्या प्रमाणावर मूर्ती तयार करण्यात आल्या होत्या.

मात्र, मुसळधार पावसाने मूर्तिकारांच्या वर्षभराच्या मेहनतीवर क्षणार्धात पाणी फेरले.पेण शहरासह जोहे, कळवे, शहापूर, तांबडशेत परिसरातील गणेश कला केंद्रांमध्ये पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. काही तयार मूर्ती पाण्यात वाहून गेल्या, तर काहींचे रंग उडाले. शाडूच्या मातीपासून तयार केलेल्या अनेक मूर्ती पाण्यात भिजून अक्षरशः विरघळून गेल्या. रंगकामाचे साहित्य, साचे, कच्चा माल आणि इतर उपकरणांचेही नुकसान झाले आहे.

शासनाच्या मदतीची आस

आधीच कच्च्या मालाच्या वाढलेल्या किमती, वाहतूक खर्च आणि बाजारातील स्पर्धेमुळे अडचणीत असलेल्या मूर्तिकारांवर अतिवृष्टीने आणखी मोठे संकट ओढवले आहे. प्रशासनाने ४३७ कारखानदारांचे नुकसान झाल्याची माहिती दिली असून, शासनाने तातडीने पंचनामे करून योग्य आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी मूर्तिकारांकडून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT